आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आध्यात्मिक:आपला स्वभावच आपल्या सुख-दु:खाचे कारण आहे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपले सुख-दु:ख, हित-अहित, शुभ-अशुभ, आरोग्य आणि आजार या सर्व संघर्षांचे मूळ कारण काय आहे? कर्मसिद्धांत म्हणतो की, ‘सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता।’ सुख आणि दु:ख देणारा दुसरा कोणी नसतो. हेदेखील एक तत्त्वज्ञान आहे. पण ‘श्रीमद् रामचरितमानस’चा गायक म्हणून ‘मानस’ने माझ्या मनात काही मूलभूत पदार्थांचे जग निर्माण केले आहे. ते म्हणजे आपल्या सुख आणि दु:खाची चार मुळे आहेत. ‘काल करम सुभाउ गुन घेरा।’ आपण सर्व या चौघांनी वेढलेले आहोत. आपण कधी काळामुळे, कधी कर्मामुळे, कधी गुणांमुळे, तर कधी आपल्या स्वभावामुळे सुखी किंवा दु:खी आहोत. भगवद्गीतेत म्हटले आहे की, जगात एकच गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे मृत्यू. दुसरे आहे कर्म. आज देशात व जगावर आलेल्या संकटाचीही ‘मानस’काराच्या तत्त्वज्ञानानुसार ही चार कारणे असू शकतात.

एक तर काळ कारण आहे. कलीचा प्रभाव इतका आहे की, आपल्या स्वार्थासाठी कधी कधी माणूस काळामुळे क्रूर बनतो. सोप्या शब्दांत सांगायचे तर हिवाळ्यात आपल्याला थंडी वाजते, उन्हाळ्यात उकडते आणि पावसाळ्यात दमटपणा असतो. प्रत्येक गोष्ट काळावर आधारित आहे. सर्व संतुलित राहिल्यास सुख; असंतुलित झाल्यास दुःख.

दुसरे म्हणजे आपले कर्म. काळ आपल्या अधीन नाही. आपण उन्हाळा पावसाळ्यात रूपांतरित करू शकत नाही. पण कर्मामुळे मिळणारे सुख-दु:ख आपल्या हातात आहे. सत्संग व संवादाद्वारे विवेक जागृत केला पाहिजे. कोणते कर्म करावे? कोणते करू नये? प्रत्येक कर्माबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. ही सावधगिरी विवेकाने येईल की क्षीर म्हणजे काय? पाणी म्हणजे काय? शुभ-अशुभ कोणते? तथापि, कर्माची गती गहन आहे. रजोगुणी व तमोगुणी कर्म विनाशाकडे नेते. सत्त्वगुणी कर्म शेवटी बंधन देते, परंतु विश्रांतीकडे नेते. तिसरे सूत्र आहे गुण. संस्कृतमध्ये गुण म्हणजे दोरी. दोरीची निर्मिती का झाली? काही बांधायचे असेल तर दोरी आवश्यक आहे. हे जग गुणमय आहे. आपण निर्गुण होऊ शकणार नाही. गुणदेखील सुख-दु:खाचे कारण आहेत.

काळ ईश्वराधीन आहे. कर्मही गहन गतीचे क्षेत्र आहे. प्रारब्ध कर्म, संचित कर्म, चालू कर्म, अकर्म-विकर्म-निष्कर्म; लोक म्हणतात की, मला माहीत आहे, मी असे करायला नको होते, परंतु मी हे कसे करून बसलो हे मला कळत नाही. हे कोणी करून घेतले? त्याला कारण कोण आहे? गुण गहन आहेत. काही बंधने सुखद असतात. आणि यातील एक सुखद बंधन म्हणजे सत्त्वगुण. माझ्या मते, सत्त्वगुणात ३ गोष्टी आहेत. ‘उपनिषदा’तील सत्, ‘गीते’तील सम व ‘रामचरितमानस’चे सर्व. म्हणूनच गोस्वामीजी म्हणतात, ज्याने मला बांधले आहे, त्यानेच मला सोडवावे, दुसरा उपाय नाही.

मी ज्यावर भर देऊ इच्छितो ते म्हणजे ‘सुभाउ’, स्वभाव. मला वाटते, आपल्या सुख-दु:खाचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपला स्वभाव. अभाव हे मोठे कारण नाही. अभावात लोक चांगले जगतात. परंतु अनेकांना इतरांचा प्रभाव असह्य वाटतो. ते मत्सर व द्वेषाने दु:खी आहेत. कोणी अभावाने, तर कोणी प्रभावाने दु:खी आहे. यातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता? आपण प्रयत्न करून अभाव कमी करू शकतो. दुसऱ्यांचा प्रभाव माझ्या कामाचा नसून उधार आहे, अशी समज आल्यास इतरांचा प्रभावही मनावर कमी पडतो. वाईट स्वभाव स्वत:ला आणि समाजालाही दु:ख देतो. सुधारला तर तो सुखही देऊ शकतो. तुलसीदासांनी रामचरितमानसात सांगितले आहे,

जासु सुभाउ अरिहि अनुकूला।
सो किमि करिहि मातु प्रतिकूला।

ज्याचा स्वभाव शत्रूलाही प्रिय वाटतो. रामाचा स्वभाव शत्रूंनाही प्रिय होता. हे तर आपले मित्र आहेत; ते आपले हित करणारे आहेत. आपला स्वभाव त्यानुसार झाला तर कर्माच्या अनुषंगाने आलेली दु:खे, वेदना, रोग व संकटांचा सामना करण्याचे सामर्थ्य आपल्याला प्राप्त होईल. जीवनात केवळ प्रकाशच आवश्यक आहे असे नाही, थोडा अंधारही गरजेचा असतो.

मोरारी बापू
आध्यात्मिक गुरू आणि राम कथाकार