आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाने आर्थिक फटका:ऐन श्रावणात ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्री शुकशुकाट, 30 ते 35 कोटींची उलाढाल थंडावणार

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे देवस्थाने बंदच, भाविकांचा हिरमोड, यात्रा नसल्याने व्यावसायिक जेेरीस

श्रावणात ज्योतिर्लिंग असणाऱ्या देवस्थानी भक्तांचा मोठी गर्दी असते. मात्र, यंदा कोरोनामुळे इतिहासात पहिल्यांदाच या ठिकाणी शुकशुकाट आहे. एकिकडे आपल्या आराध्य देवताचे दर्शन घेता येत नसल्याने भाविकांचा हिरमोड होत आहे. तर दुसरीकडे श्रावणावर अवलंबून असलेली या शहरांची अर्थव्यवस्था पार कोलमडली आहे.

घृष्णेश्वर : २५ लाख भाविक दर्शनाला मुकणार, पाच कोटींचा व्यवसाय ठप्प
महेश जोशी | औरंगाबाद

ज्योतिर्लिंग यात्रेचा समारोप औरंगाबाद जिल्ह्यातील घृष्णेश्वराच्या दर्शनाने होतो. यास लागूनच वेरुळ लेणी आहेत. घृष्णेश्वराच्या दर्शनासोबत लेणी पर्यटनासाठी रोज २५ ते ३० हजार भाविक येथे भेट देतात. श्रावणात ५० ते ६० हजार तर सोमवारी एक लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात, अशी माहिती घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष आर. टी. कौशिके यांनी दिली. लॉकडाऊनमुळे श्रावणात २५ लाखांहून भाविकांना दर्शनाला मुकावे लागले आहे. मंदिर परिसरात १०४ बेल-फुलाची दुकाने, १०-१२ हस्तकला विक्रेते, २०-२२ फोटोग्राफर, २५ पुरोहित तर ६० रिक्षाचालक आहेत. मंदिर, लेणी परिसरात पाच हजार लोक व्यवसाय करतात. त्यांच्या कुटूंबियांसहित २५ हजार लोकांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. श्रावणात पाच ते सहा कोटी रुपयांचा व्यवसाय होतो. तो ठप्प झाल्याचे “एलोरा केव्हज शाॅपकीपर्स अॅण्ड हॉटेल ओनर्स असोसिएशन’चे अध्यक्ष मकरंद आपटे यांनी सांगितले.

त्र्यंबकेश्वर : उत्पन्नाच्या दोन महिन्यांतच लॉकडाऊन, नुकसान दहा कोटींंवर
दिप्ती राऊत | नाशिक

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरला श्रावणात रोज ३०-३५ हजार तर श्रावणी सोमवारी लाखाच्या घरात तर तिसऱ्या सोमवारी तीन लाखांवर भाविक येतात. श्रावणातील पूजा आणि भाद्रपदातील श्राद्ध विधी हे दोन महिने वर्षातील सर्वाधिक रेलचेलीचे असल्याचे या काळात पुरोहित वर्गाचे उत्पन्न अंदाजे पाच कोटींच्या घरात जाते. मंदिर, कुशावर्त परिसर आणि पूजा विधी बंद असल्याने नुकसान होत असल्याचे पुरोहित संघाचे प्रवक्ते राजेश दीक्षित यांनी सांगितले. तीर्थस्थळी आखाडे, वेद पाठशाळा, धर्मशाळा, पूजा साहित्य विक्रेते, रिक्षाचालक अशा सुमारे सात हजार कुटुंबांचे व्यवसाय गुंफलेले आहेत. त्यांनाही कोट्यवधींच्या कमाईला मुकावे लागले आहे. एकट्या त्र्यंबकेश्वर देवस्थानचे श्रावणातील उत्पन्न एक कोटी असल्याची माहिती देवस्थानचे विश्वस्त संतोष कदम यांनी दिली. देवस्थानचे एक कोटी, पुरोहितांचे पाच कोटी व अन्य व्यवसायिकांचे तीन ते चार कोटी असे दहा कोटींच्या उलाढालीवर पाणी पडले आहे.

औंढा नागनाथ
कोरोना संकटामुळे चार कोटींची उलाढाल थांबली

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे आठवे ज्योतिर्लिंग आहे. मंदिरात श्रावणात रोज ७० ते ७५ हजार तर सोमवारी एक लाखापेक्षा जास्त भाविक येतात. भाविकांकडून दानपेटीत सुमारे ५० लाख रक्कम जमा होते. परिसरात बेलफूल, पूजा साहित्य, प्रसाद, देवाच्या फ्रेम आदीची १८० ते २०० दुकाने आहेत. या काळात हॉटेल व्यवसायाला भरती येते. मंदिरात पूजा, अभिषेक, जप करण्यासाठी १६५ पुरोहितांना मागणी असते. महिनाभरात सुमारे ३.५ ते ४ कोटी रुपयांची उलाढाल होते. कोरोनामुळे सर्वच थांबले आहे.

परळी वैद्यनाथ
मंदिर बंद, नुकसान सुरू दीड कोटींचे उत्पन्न बुडाले

बीड जिल्ह्यातील परळीचे वैद्यनाथ पाचवे ज्योतिर्लिंग अाहे. मंदिरात श्रावणात रोज ५० ते ६० हजार भाविक येतात. श्रावणी सोमवारी एक लाख भााविक येतात. महिनाभरात भाविकांकडून दानपेटीत ३० लाख रुपयांच्यावर रक्कम टाकली जाते. मंदिर परिसरात बेल-फुल, पूजेचे साहित्य, प्रसाद, खेळणी, हॉटेल अशी ३५ ते ४० दुकाने आहेत. या विक्रीतून श्रावणात ३५ ते ४० हजार रुपयांचा व्यवसाय होतो. ४५ ते ५० पुजारी मंदिरात पूजा-अभिषेक करतात. लॉकडाऊनमुळे सर्वांवर गदा आली आहे. श्रावणात सर्व मिळून सव्वा ते दीड कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

भीमाशंकर
दर्शनापासून दहा लाख भाविक वंचित राहणार

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरला दरवर्षी श्रावण महिन्यात सुमारे दहा लाख भाविक दर्शनासाठी येतात. सोमवारी दक्षिणा पेटी, पूजा-अभिषेकाचे किमान दहा लाखांचे उत्पन्न मंदिराला मिळते. यात्रेवर परिसरातल्या १५० ते २०० व्यावसायिकांची उपजिविका आहे. यंदा त्यांचे उत्पन्न बुडाले. ट्रस्टच्या ५० कर्मचाऱ्यांना नियमित वेतन सुरू असल्याची माहिती भीमाशंकर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त संजय गावंडे यांनी दिली. जंगलात वीज, इंटरनेटची अडचण असल्याने ऑनलाईन दर्शन शक्य नाही.