आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अष्टविनायक महिमा:त्रिपुरासुर शरण आला तो ओझरचा श्रीमंत विघ्नेश्वर गणेश

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अष्टविनायकांतला हा सर्वात श्रीमंत गणपती मानला जातो

ओझरचा विघ्नेश्वर
अष्टविनायकांतील पाचवा गणपती म्हणजे पुणे जिल्ह्यातील ओझर येथील ‘विघ्नेश्वर’. अष्टविनायकांतला हा सर्वात श्रीमंत गणपती मानला जातो. मंदिराला चारही बाजूंनी तटबंदी आहे व मधोमध मंदिर बांधण्यात आले आहे.

मूर्तीची वैशिष्ट्ये : डोळ्यात माणिक
मंदिरातील गाभाऱ्यात पूर्वाभिमुखी मूर्ती आहे. मूर्तीच्या डोळ्यात माणिक तर कपाळावर, नाभीवर हिरे आहेत. श्रींची मूर्ती डाव्या सोंडेची आहे. मंदिराच्या पुढे २० फूट लांब सभागृह आहे. आतील गाभारा १० बाय १० फुटांचा आहे. १७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजीअप्पा यांनी देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढवल्याचा उल्लेख आढळतो. मंदिराच्या चारही बाजूंनी दगडी तटबंदी आहे. मंदिर परिसरात दोन अत्यंत रेखीव अशा दीपमाळा आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करता प्रसन्नतेची अनुभूती होते.

आख्यायिका : विघ्नासुर आला शरण
राजा अभिनंदनाला त्रिलोकाधीश व्हायचे होते. यासाठी त्याने महायज्ञ सुरू केला. त्या यज्ञाला रोखण्यासाठी व त्यात विघ्न आणण्यासाठी इंद्राने ‌विघ्नासुराची उत्पत्ती केली. विघ्नासुराने इतर यज्ञातही विघ्न आणण्यास सुरुवात केली. विघ्नासुराचा बंदोबस्त करण्यासाठी ऋषिमुनींनी गजाननाला साकडे घातले. विघ्नासुर गजाननाला शरण आला. जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर गजाननाने विघ्नासुराला सोडून दिले. हाच तो विघ्नेश्वर गणेश.

असे पोहोचाल ओझरला
- ओझर लेण्याद्रीपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून ८५ किलोमीटर अंतरावर ओझर येते.
- नाशिकपासून सिन्नर-आळेफाटामार्गे १३९ किलोमीटरचे अंतर पार केल्यावर ओझर गणपतीला जाता येते.