आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अष्टविनायक महिमा:कार्य सिद्धीस नेणारा उजव्या सोंडेचा सिद्धटेकचा सिद्धिविनायक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कार्य सिद्धीस नेणारा सिद्धिविनायक

सिद्धटेकचा सिद्धिविनायक
अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेकचा सिद्धिविनायक. हा गणपती उजव्या सोंडेचा असल्याने याचे सोवळे अत्यंत कडक मानले जाते.

मूर्तीची वैशिष्ट्ये : उत्तराभिमुख मूर्ती
मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. मूर्तीचे मुख उत्तरेकडे आहे. ही मूर्ती उजव्या सोंडेची असल्याने या देवाचे सोवळे अत्यंत कडक मानले जाते. गजाननाने एक मांडी घातली असून तिथे रिद्धी व सिद्धी विराजमान आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य आणि गरुड आसनस्थ आहेत. मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला असून मंदिराला एक प्रदक्षिणा घातली तर एक किलोमीटर इतके अंतर होते. पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी या टेकडीवरील मंदिराचा रस्ता बांधला होता.

आख्यायिका : मधू, कैटभचा वध
मधू आणि कैटभ या असुरांनी पृथ्वीवर उच्छाद मांडला होता. ते कुणालाही जुमानत नव्हते. भगवान विष्णूलाही नाही. या दोन असुरांचा पराभव करण्यासाठी भगवान शंकरांनी विष्णूला गजाननाची आराधना करायला लावली. याच ठिकाणी विष्णूने गजाननाची आराधना करत या दोन असुरांचा वध केला. यानंतर श्री गजानन येथे विराजमान झाले, अशी आख्यायिका आहे. येथील मूर्ती ही स्वयंभू असून उजव्या सोंडेची असणारी अष्टविनायकातील मूर्ती आहे.

असे पोहोचाल सिद्धटेकला
दौंड हे अत्यंत जवळचे रेल्वेस्टेशन. येथून १८ किलोमीटरवर सिद्धिविनायक मंदिर आहे. पुण्यावरून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस-दौंडमार्गे ९८ किलोमीटर अंतरावर सिद्धिविनायक.