आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत ऊर्जा:आता आपल्या भयावर मात करा, आपल्या भीतीवर विजय मिळवणे शक्य

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण सर्व जण आयुष्यात कधी ना कधी घाबरलेलो असतो, मग ते रुग्णालयात इंजेक्शन घेणे असो की करिअरची प्रवेश परीक्षा. भीती अनेक स्वरूपांत येते. भीती ही एक सार्वत्रिक मूलभूत भावना आहे, ती आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. म्हणजेच भीती बऱ्याच प्रमाणात आवश्यक आहे.

भीती मानसिक आणि भावनिक पातळीवर असते. भूतकाळातील वाईट आठवणी सतत आठवणे किंवा भविष्यातील भीतीबद्दल सतत विचार करणे यामुळे भीती इतकी वाढते की ती जीवनापेक्षा मोठी होते. मग भीती तर्कहीन बनते. यामुळे चिंता, तणाव आणि आरोग्य बिघडू लागते. समकालीन जीवनात प्रचलित असलेली भीती इतकी प्रबळ झाली की भीती वास्तविक परिस्थितीपेक्षा आपले अधिक नुकसान करू लागली आहे. लोकसंख्येच्या मोठ्या वर्गासाठी भीती इतकी प्रभावी भावना बनली आहे की तिचा सामना करणे हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय झाले आहे. अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी भीतीवर मात करणे गरजेचे आहे.

भीती ही फक्त एक भावना आहे, यावर विश्वास ठेवल्यास ती भावना वाढवू नये, हे नक्की होते. बऱ्याचदा स्वत:ला योग्य माहिती व आकडेवारी देणे आणि एखाद्या विषयात प्रावीण्य मिळवणे यातून भीती दूर करण्याची शक्ती आणि आत्मविश्वास मिळतो. प्रसिद्ध टोस्टमास्टर्स क्लब लोकांमधील बोलण्याची भीती दूर करण्यासाठी पद्धतशीरपणे संवेदनशीलता कमी करण्याचे काम करते. थोड्या काळासाठी स्वतःला भीतिदायक परिस्थितीत ठेवणे आणि हळूहळू जोखमीचा वेळ वाढवणे हे या तंत्रात समाविष्ट आहे. यामुळे प्रत्येक वेळी आपली तर्कशुद्धता मजबूत होते आणि अखेरीस आपला मेंदू राईचा पर्वत करणे थांबवतो. घाबरत जगणे म्हणजे प्रत्येक क्षणी मरण्यासारखे आहे. म्हणून आपण सर्वात वाईट परिस्थितीबद्दल विचार करतो आणि मानसिकरीत्या ते स्वीकारतो तेव्हा आपण संधींचा पुरेपूर लाभ घेण्यास सक्षम होतो.

भीतीवर मात करण्यासाठी वैदिक दृष्टिकोन आपल्याला खोल अंतर्दृष्टी देते. तो भीतीला केवळ एका सखोल आजाराचे लक्षण मानतो, म्हणजेच मनाची आसक्ती आणि आसक्तीच्या विषयातून संभाव्य हानी. उदाहरणार्थ, मालमत्तेवरील आसक्तीमुळे गरिबीची भीती निर्माण होते, सामाजिक प्रतिष्ठेची आसक्ती टीका इ.ची भीती निर्माण करते. त्याचप्रमाणे समृद्धी, सुख आणि जीवनाबद्दलच्या आसक्तीमुळे नैसर्गिक आपत्तींची भीती निर्माण होते. जीवन नश्वर आहे, हे आपण जाणतो, तरीही आपण घाबरतो. आत्मा अमर आहे, हे ज्ञान आपण विसरतो. अशा ज्ञानावर चिंतन केल्याने आपल्याला मृत्यूच्या भीतीतून बाहेर येण्यास मदत होते.

आपण आपल्या कम्फर्ट झोनवर मानसिकरीत्या आसक्त असतो, आपल्याला आपल्या परिस्थितीनुसार, आयुष्याच्या योजनांनुसार सर्व काही हवे असते, तेव्हा भीती हा त्याचा नैसर्गिक परिणाम असतो. याताून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शक्य ते सर्वोत्तम करण्यावर लक्ष केंद्रित करणे आणि कोणत्याही परिणामाला देवाची इच्छा म्हणून स्वीकारणे. ईश्वर आपल्या भल्यासाठीच सर्व काही करतो, हे मान्य केल्यावरच आपण नदीप्रमाणे वाहणे शिकू. त्यामुळे फळाची आसक्ती कमी होईल आणि मग परिणामांची आसक्ती संपेल.

महाभारत युद्धादरम्यान भीष्माने अर्जुनाला ठार करण्याचा संकल्प केला होता तेव्हा भगवान श्रीकृष्णही पांडव कुळातील इतरांसह चिंतित झाला होता. मध्यरात्री तो अर्जुनाला धीर देण्यासाठी तेव्हा अर्जुन घोरत होता. जागा झाल्यावर अर्जुनाने स्पष्ट केले की, प्रत्यक्ष ईश्वर त्याच्या सुरक्षिततेसाठी इतका चिंतित असताना त्याला घाबरण्याचे काही कारण नव्हते. भीतीवर मात करण्याचे सर्वात सोपा आणि शक्तिशाली माध्यम म्हणजे देव आणि गुरू आपले साक्षीदार आणि संरक्षक आहेत, यावर पूर्ण विश्वास ठेवणे. आपण त्या सर्वशक्तिमानाला शरण जातो तसतशी आपली भीती नाहीशी होते. आपल्याकडे एकच मन आहे. भीतीचा विचार करण्याऐवजी देवाचे स्मरण करा. एकटेपणा, साथीदारांचा दबाव, आर्थिक असुरक्षितता इ.शी संबंधित भीती आपल्याला मानसिकदृष्ट्या कमकुवत करते, तर ईश्वरावर लक्ष केंद्रित केल्याने आपला उद्धार होतो. ईश्वर, दैवी नावे, रूपे, गुण, लीला किंवा संत यांचे ध्यान करून भीतीवर मात करण्यासाठी स्वतःला प्रेरित करा.

ईश्वर आपल्या भल्यासाठीच सर्व काही करतो, हे मान्य केल्यावरच आपण नदीप्रमाणे वाहणे शिकू. त्यामुळे फळाची आसक्ती कमी होईल आणि आपण भीतीमुक्त होऊ.

स्वामी मुकुंदानंद, आध्यात्मिक गुरू आणि लेखक

बातम्या आणखी आहेत...