आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधानसभा निवडणूक:बिहारमध्ये पहिल्या कॅबिनेट बैठकीत दहा लाख नोकऱ्या देणार : राजद

पाटणा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोजगाराच्या मुद्द्यावर सत्ताधारी-विरोधकांत संघर्ष

बिहारमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आश्वासनांचा जणू पाऊस पडू लागलाय. सत्तेवर आल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीत बिहारमधील १० लाख तरुणांना नोकऱ्या दिल्या जातील, असे आश्वासन राजद नेते तेजस्वी यादव यांनी दिले. बिहारमध्ये आधीच ४ लाख ५० हजार रिक्त जागा आहेत.

शिक्षण, आरोग्य, गृह विभागासह इतर अनेक विभागांत राष्ट्रीय सरासरीच्या मापदंडानुसार बिहारमध्ये आता ५ लाख ५० हजार नियुक्त्या अपेक्षित आहेत. तेजस्वी माध्यमांना म्हणाले, राजदने ५ सप्टेंबर रोजी बेरोजगारांच्या नाेंदणीसाठी एक संकेतस्थळ व मिस्ड कॉल नंबर दिला होता. त्यात २२ लाखांहून जास्त लोकांनी नोंदणी केली आहे. बिहार सार्वजनिक बांधकाममंत्री नंदकिशोर यादव यांनी तेजस्वी यांना टोला लगावला आहे. विरोधी पक्षाच्या तरुण नेत्याने लॉलीपॉप दाखवू नये. यंदा लोकसभा निवडणुकीसारखे खाते उघडणे कठीण दिसते. कॅबिनेट बैठकीचे स्वप्न दाखवले जात आहे. आपल्या आई-वडिलांचा कार्यकाळ आठवून बघावा. तेव्हा थोडीफार भरती होत असली तरी त्यावरही बोली लावली जात होती, असे नंदकिशोर यांनी म्हटले.

विरोधी : काँग्रेसला डाव्या पक्षांवर वाटतोय विश्वास
विरोधकांच्या महाआघाडीत जागावाटपावरून दररोज नवनवीन जोडाजोडीची गणिते समोर येत आहेत, परंतु अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. यादरम्यान काँग्रेसचे नेते म्हणाले, जितनराम मांझी यांचा हम पक्ष महाआघाडीतून बाहेर पडला. रालोसपानेदेखील नाराजी व्यक्त केली. कारण काँग्रेसने डाव्या पक्षांना महाआघाडीत घेण्याबाबत विचार सुरू केला आहे. डाव्या पक्षांना राज्यातील काही भागात पाठिंबा आहे. ते वैचारिकदृष्ट्या भाजपविरोधी आहेत. डाव्यांनी मागितलेल्या जागा राजद देऊ इच्छित नाही. त्यामुळे जागावाटपात विलंब होत आहे.

सत्ता : तज्ञांचा दावा- डिजिटल प्रचारामुळे रालोआस लाभ
सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपमेंट सोसायटीजचे (सीएसडीएस) संचालक संजयकुमार म्हणाले, बिहारमध्ये डिजिटल प्रचाराचा लाभ रालोआला मिळेल. त्यातही भाजपला डिजिटल व तंत्रज्ञानाच्या वापराचा तगडा अनुभव आहे. २०१४ च्या निवडणुकीपासून भाजपने डिजिटल निवडणूक प्रचाराची सुरुवात केली होती. एका मुलाखतीत कुमार म्हणाले, बिहारमध्ये सध्या विखुरलेली परिस्थिती दिसून येते. त्यामागे आत्मविश्वासाचा अभाव हे कारण आहे. विजयाची शक्यता असलेल्या आघाडीत जाण्याचा छोट्या पक्षांचा कल असेल.

सुशांत केसमधील चर्चित माजी डीजीपी पांडेय जदयूमध्ये
बिहारचे माजी डीजीपी व अलीकडेच स्वेच्छानिवृत्ती घेणारे गुप्तेश्वर पांडेय यांनी रविवारी जदयूमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांना जदयूचे सदस्यत्व प्रदान केले. पांडेय यांनी एक दिवस आधी नितीश यांची भेट घेतली होती. पांडेय जदयूच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पांडेय अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणातील तपासामुळे चर्चेत आले होते. त्यांनी प्रकरणाच्या तपासाबाबत मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. त्यानंतर बिहार सरकारने प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. त्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले होते.

बातम्या आणखी आहेत...