आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपले मूल बंडखोर होते. ऐकत नाही. खोटे बोलते. अनेक मुले आपल्या पालकांनाच डिच्चू देऊन रिजेक्ट करतात. मुलांच्या या वर्तन समस्या का निर्माण होतात. त्यावर उपाय काय, हेच जाणून घेऊ महाराष्ट्र राज्य मानसशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. संदीप सिसोदे यांच्याकडून आजच्या जीवन मंत्रमध्ये.
मुलांना सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत. पौगंडावस्था, करिअरची निवड हे एकाहून एक महत्त्वाचे टप्पे. इथे वाट चुकली, पाय घसरला की, गाडी रुळावर यायला वेळ लागतो. मात्र, हे सहजपणे टाळता येते. त्यासाठी पालकांनी फक्त सजग असायला हवे.
असंख्य तक्रारी
मुले ऐकत नाहीत. उलटून बोलतात. तोडफोड करतात. बहीण-भावाचे पटत नाही. नेहमी भांडतात. मोठ्याने बोलतात. खोटे बोलतात. अभ्यासात कामचुकारपणा करतात. लिखाण करत नाहीत. वेळेवर शाळेत जात नाहीत. उशिरा उठतात. पालकांच्या अशा असंख्य तक्रारी प्रत्येक घरात असतात. मात्र, अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवर आपण काम केले, तर मुलांच्या वर्तन समस्या आपोआप कमी होतात. ते कसे हेच जाणून घेऊ.
सूचनांचा भडिमार
मुलाला कळायला लागते, तेव्हापासून आई-वडील त्याला काळजीपोटी सूचना देतात. मात्र, या सूचनांचा भडिमार होतो. अतिरेक होतो. तेव्हा ते बाळ प्रतिक्रिया द्यायला लागते. उलटून बोलते किंवा खोटे बोलते. मला सुद्धा माझे कळते, अशी भावना त्याच्या मनात असते आणि ही गोष्ट अगदी खरी आहे. आई-वडिलांनी मुलावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांना चांगले संस्कार दिले पाहिजे. त्यांना चांगले घर दिले पाहिजे. चांगले संगोपन केले पाहिजे. हे सारे आपण करतोही. मात्र, त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. कमीत कमी सूचना देत नाही. मात्र, या दोनच गोष्टींचे पालन केले. विश्वास ठेवला. कमीत कमी सूचना दिल्या, तर समस्या सुटायला निश्चितच मदत होते.
अशी होते निवड
एक उदाहरण सांगता येईल. समजा एक नवी बाई घरात आली आहे. ती घरातल्या कर्त्या महिलेला काही शिकवत आहे. सतत सूचना देत आहे. तुम्ही असा हात धुवून घ्या. अशी कणिक मळा. असा गॅस पेटवा. तुम्ही अशी पोळी करायला पाहिजे. अशी भाजी करायला पाहिजे. तुम्हाला जमते की नाही. मलाच सगळे शिकवावे लागेल का? वगैरे वगैरे. आता संध्याकाळी तुम्ही दुसऱ्या बाईंना बोलावले. त्या बाई तुम्हाला म्हणाल्या, ताई मी इथे तुझ्यासोबत बाजूला बसणार आहे. तुला जे जमते ते कर. नाही जमले तर मला विचार. मी तुझी मदत करेन. आता तुम्हाला विचारले की, यापैकी कोणती शिक्षिका आवडेल, तर उत्तर येईल, दुसरी शिक्षिका आवडेल. कारण ती अतिशय कमी शब्दांत आणि सकारात्मक बोलली.
पळवाट काढतात
आता अवघ्या दोन - तीन सेकंदामध्ये आपण एका शिक्षिकेला रिजेक्ट केले. मूल दहा वर्ष, बारा वर्ष, अठरा वर्ष होईपर्यंत तुम्ही त्याला सतत सूचना देत असाल, अविश्वास दर्शवत असाल, तर ते त्यांना जास्त त्रासदायक होते. त्यामुळे मूल इमोशनली डिस्टर्ब होते. ते तुम्हाला रिजेक्ट करायला लागते. या रिजेक्टमधून इतर प्रकार सुरू होतात. खोटे बोलणे, उलट उत्तर देणे, कमी अभ्यास करणे, अभ्यासातून पळवाट काढणे.
थोडा बदल हवा
पेपर देऊन मूल घरी आले की, आपण सुरू होतो. पेपर चांगला गेला नाही ना. मी तुला म्हणत असते, अभ्यास करून जायला पाहिजे होतास. तू करून गेला नाहीस. किती नुकसान झाले, असे व्यक्त होण्यापेक्षा थोडा बदल करा. आपले मूल नर्व्हस होऊन आले आहे. बोअर झाले आहे. हे चेहऱ्यावरून कळते. तर त्याला काय आवडते ते खायला द्या. जेवण करू द्या. निवांत बसू द्या. त्याचा मूड थोडा चांगला झाला की, त्याच्याशी बोला. मग ते त्याच्या आतापर्यंत जाईल. तो त्याला सकारात्मक प्रतिसाद देईल. अन्यथा शाळेतून आल्या-आल्या प्रश्नांचा भडिमार केला, तर रिअॅक्ट होईल.
इतके नक्की करू
अनेक जण म्हणतात की, आमचे मूल शाळेतले काही सांगतच नाही. कारण आपण त्याला सारखे प्रश्न विचारत असतो. त्याला वाटते की, आपण काही सांगितले, तर त्यातून अजून काही प्रश्न विचारले जातील. त्यात पुन्हा तू कसा चुकलास हे सांगितले जाईल. त्यामुळे बाळ शांत राहणे पसंद करते. अशा मुलांचे ऐकुण घ्यायला सुरुवात करा. मुलांना ऐकल्यामुळे त्यांच्यात खूप मोठे सकारात्मक बदल होतात. आपल्या मुलासाठी आपण इतके नक्कीच करू शकतो.
(टीपः 'मुलांच्या वर्तन समस्या' हा विषय सविस्तर जाणून घेण्यासाठी बातमीतला व्हिडीओ जरूर पाहा.)
जीवन मंत्रचे इतर भागः
1) करिअरमध्ये यश मिळवून देणारी भावनिक बुद्धिमत्ता असते काय, तिचा वापर कसा करावा?
2) करिअर ते शिक्षण निर्णय कसा घ्यावा? भावनेला प्राधान्य द्यावे की, प्रॅक्टिकली विचार करावा?
3) करिअर का थांबत, ब्रेकअप कसं होतं; संवाद चुकतो कुठे, तो कसा असावा, जाणून घेऊयात!
4) एखाद्या व्यक्तीबद्दलच्या अढीमुळे आयुष्य होते उद्धवस्त; हे मानसिक वादळ कसे शांत करावे? जाणून घेऊ!
5) नैराश्य का येते, त्याची लक्षणे कोणती, त्यातून बाहेर कसे पडावे, जाणून घेऊ तज्ज्ञांकडून
6) यशाचा टर्निंग पॉइंट असणाऱ्या संवादात शब्दांचे महत्त्व फक्त 7 टक्के; यात प्रावीण्य मिळवायचे कसे?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.