आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Companies Refuse Corona Policies Due To Increased Losses; The Insurance Authority's Letter Showed A Basket Of Bananas; News And Live Updates

कोरोना कवच:तोटा वाढल्यामुळे कोरोना पॉलिसींना कंपन्यांचा नकार; विमा प्राधिकरणाच्या पत्राला दाखवली केराची टोपली

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंपन्यांच्या मनमानीबाबत सरकारी पातळीवर मौन

विमा क्षेत्रात कार्यरत अनिल चव्हाण यांनी स्वत:साठी २७ जुलै २०२० रोजी साडेनऊ महिन्यांच्या कालावधीसाठी एका कंपनीचा ५ लाखांचा कोरोना कवच विमा घेतला. मे २०२१ रोजी त्यांनी याच्या नूतनीकरणासाठी संबंधित कंपनीशी संपर्क केला असता कंपनीने त्यांच्या विम्याचे नूतनीकरण करण्यास नकार दिला. परिणामी कोरोना झाल्यावर त्यांना सर्व उपचारांचा खर्च स्वत:च्या खिशातून करावा लागला आणि “कोरोना कवच’चा काहीही उपयोग झाला नाही. हा अनुभव आहे देशभरातील लाखो नागरिकांचा.

नफ्याची टक्केवारी घसरल्याने देशातील विमा कंपन्या नवीन ग्राहकांच्या कोरोना कवच, कोरोना रक्षक या विमा सेवा देण्यास, जुन्या विम्याचे नूतनीकरण करण्यास नकार देत असल्याने अनेक ग्राहकांचा तोटा होत आहे. भारतीय विमा नियमन व विकास प्राधिकरणाकडे (आयआरडीए) याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून कोरोना कवच व रक्षक विमा पॉलिसी देणे कंपन्यांना बंधनकारक असल्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहे. मात्र, कंपन्यांनी त्यासही केराची टोपली दाखवून ३० पैकी २९ कंपन्या कोरोना कवच व रक्षक विम्यास नकार देत आहेत.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गात केंद्र सरकारने नागरिकांसाठी कोरोना कवच, कोरोना रक्षक यासारख्या विशेष विमा सेवांची घोषणा केली. पहिल्या लाटेतील रुग्णांच्या उपचाराचे आकडे पाहिल्यावर लोकांनी मोठ्या प्रमाणात कोरोना कवच विमा घेण्यास सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर हा विमा काढला गेला. त्यानंतर १३ ऑक्टोबर २०२० रोजी या विम्याच्या नूतनीकरणाचे आदेश काढण्यात आले.

मात्र, वाढत्या संसर्गामुळे दाव्यांचे प्रमाणही वाढल्याने या सेवेबाबत कंपन्यांच्या नफ्याची टक्केवारी कमी होत तोट्याची टक्केवारी वाढू लागली. परिणामी, बहुतांश कंपन्या नवीन ग्राहकांसाठी कोरोना कवच विमा देण्यास वा जुन्या विम्याचे नूतनीकरण करण्यास नकार देत आहेत. दरम्यान, हे सरकारी नियमाविरोधात असल्याने याबाबत कंपन्यांनी कोणतीही लेखी सूचना काढलेली नाही, सर्व एजंट्सना याबाबतच्या तोंडी सूचना दिल्याचे कळते.

कंपन्यांच्या मनमानीबाबत सरकारी पातळीवर मौन
याबाबत भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाकडे अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत. यांची दखल घेऊन प्राधिकरणाने विमा कंपन्यांसाठी विशेष परिपत्रक जाहीर करून, अशा प्रकारे ग्राहकांना कोरोना कवच विमा देण्यास वा नूतनीकरणास नकार न देण्याच्या सूचना दिल्या आहेत. २७ जून २०२० च्या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित कंपन्यांवर कोरोना कवच विमा देण्याची सेवा बंधनकारक असल्याचे स्मरण करून दिले होते. मात्र, त्यासही कंपन्यांनी केराची टोपली दाखवली असून, कंपन्यांच्या मनमानीबाबत सरकारी पातळीवर मौन बाळगले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...