आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य:हायड्रेटेड राहण्याचे फायदे रोगप्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाचे आहेत आणि आवश्यकही

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाणी हा सर्वात कमी महत्त्व दिला जाणारा पोषणघटक आहे. आपण जे पाणी पितो त्यात खरंतर आरोग्याचे अनेक लाभ असतात. पाणी आपुष्यासाठी अमृत आहे. आपल्या शरीरात ७० टक्के भाग पाणी असतं आणि शरीरातील प्रत्येक पेशीला हायड्रेट, डीटॉक्स करण्यासाठी आणि शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. पाण्यामुळे आपण आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारू शकतो. म्हणूनच पाण्याबद्दल जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे.

पेशींच्या बांधणीची अखंडता :
केस, त्वचा, नखे यांच्यातील पेशींची बांधणी टिकवून ठेवण्यासाठी पाणी आवश्यक आहे आणि काही प्रमाणात कोलेजनच्या निर्मितीतही पाणी आवश्यक असते. वय वाढल्याच्या खुणा दिसू नयेत यासाठी कोलेजन फार महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे सांध्यांची अखंडता आणि कण्याची मजबुती टिकवण्यासाठीही पाणी हवं आहे. भरपूर पाणी प्यायल्याने त्याचा वंगणासारखा वापर होतो. ज्यामुळे सांध्यांचे घर्षण कमी होते.

शरीराचे तापमान नियंत्रित राखले जाते :
शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी, विविध द्रावांचा समतोल राखण्यासाठी पाणी गरजेचं आहे. आपल्या शरीरातील द्रावांचे कार्य योग्य पद्धतीने चालावे यासाठी शरीराचे तापमान योग्य राखणे आवश्यक असते. तसे न झाल्यास अनेक क्रिया बंद पडू शकतात.

शरीरातील चरबी जाळली जाते :
आजवरच्या अनेक संशोधनातून हे स्पष्ट झालंय की पाणी आणि शरीरातील चरबी कमी होण्याचा परस्परसंबंध आहे. अधिक पाणी प्यायल्याने वजन कमी झाल्याचे दिसून आले आहे.

हायड्रेट राहण्यासाठी आणि रीहायड्रेटशनचा सर्वोत्तम मार्ग:
तहान लागणे म्हणजे डीहायड्रेशनचं शेवटचं लक्षण आणि त्यामुळेच प्रत्येकाने दिवसभर पाणी पित राहणं गरजेचं असतं. डीहाड्रेशन म्हणजेच शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने शरीरातील ऊर्जा कमी होते आणि त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही मंदावते. खेळासारख्या अत्यंत सक्रिय कृतींमध्ये माणसाला प्रचंड घाम येतो आणि अशा लोकांनी सतत शरीराला योग्य रितीने हायड्रेट करणे फार आवश्यक असतं. पाण्याची प्रचंड कमतरता निर्माण झाल्याने वंगणाची मात्रा कमी होते आणि त्यामुळे क्रॅम्प्स किंवा पेटके येतात. प्रचंड मेहनत घेणारे अॅथलेट्स आणि बास्केटबॉलपटूंना हायपरथर्मियाचा त्रास होऊ शकतो किंवा पाण्याची कमतरता आणि प्रचंड डीहायड्रेशनमुळे रक्तदाबही कमी होतो. अतिसार, पाणी कमी पिणे, पोटाचा फ्लू, अतिरिक्त औषधे अशी कोणतीही कारणे किंवा आदल्या रात्रीच्या मद्यपानाचा परिणाम... कोणत्याही कारणाने डीहायड्रेशन झाले असेल तर तातडीने रीहायड्रेशनचे उपाय करणे आवश्यक आहे. तोंडावाटे किंवा नसेतून द्रवपदार्थ देऊन रीहायड्रेशन करता येते.

सध्याच्या जागतिक महासंकटाच्या काळात आपल्यापैकी अनेक जण घरातील आरामदायी वातावरणात काम करत आहे. त्यामुळे कधीतरीच पाणी पिणे ही जणू आपली सवय झाली आहे. कधीही न संपणाऱ्या व्हर्च्युअल मिटिंग्स, कॉन कॉल्स, असाइनमेंट आणि घरातली कामं या सगळ्याचा ताळमेळ बसवताना आपण पाणी प्यायला मात्र विसरतो. अशा परिस्थितीत आपल्याला सतत पाणी पिण्याची आठवण ठेवायला हवी. त्यासाठी पाण्याची बाटली जवळच ठेवा किंवा ही आठवण करून देण्यासाठी एखादे हेल्थ अॅप वापरा.

पचनाला साह्य होते आणि मौखिक आरोग्याला साहय मिळते :
एक प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो की 'पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवणाच्या आधी? की जेवणानंतर? की जेवताना?' या तीनही वेळा पाणी प्यायल्याने अन्न अधिक चांगल्या प्रकारे पचतं. यामुळे लाळ तयार होण्यात साह्य होते. यातील इलेक्ट्रोलायटस, म्युकस आणि एन्झाइम्स अन्न पचण्यात साह्य करतात आणि मौखिक आरोग्य चांगले राहते. अन्नाचे पचन तोंडातच सुरू होते आणि वयानुसार लाळ तयार होण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तोंड कोरडे पडल्यासारखे वाटत असेल तर पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा.

डीटॉक्स करण्यातही मदत :
पाण्याचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे डीटॉक्स करणे. त्यामुळे आपल्या रोगप्रतिकारशक्तीलाही पाठबळ मिळते. दिवसभरात शरीरात अनेक टॉक्सिन्स म्हणजेच विषारी घटक जमा होत असतात, त्यातील काही पर्यावरणातील असतात, काही अन्नातून येतात. डीटॉक्स होण्याची क्रिया मूत्रातून, मलातून आणि घामातून होते. घामामुळे शरीराचं तापमानही नियंत्रित होत असतं. उन्हाळ्याच्या दिवसांत सध्या आपल्यापैकी अनेक जण घरातच आहेत. घरात एसी लावल्याने तर दिवसभर पुरेसं पाणी पित राहणं फारच गरजेचं ठरतं. कमी पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता किंवा मूतखड्याचा त्रास होतो. पाणी कमी पिणाऱ्या लोकांना मूत्रविर्सजनाचा त्रास होतो आणि त्यातून खडे तयार होतात. मूत्र योग्य रितीने द्राव म्हणून बाहेर पडावे यासाठी पुरेसं पाणी प्यायला हवं. मलविसर्जन योग्य रितीने होण्यासाठीही याचा फायदा होतो.

त्याचप्रमाणे, रक्तातील प्रवाहीपणा कायम राखण्यासाठीही आपण पुरेसं पाणी प्यायला हवं. त्यामुळे पोषक घटक शरीरात सर्वत्र सहज पोहोचतात. यामुळे सक्रियता वाढते आणि मानसिक थकवा कमी होतोच. शिवाय, चयापचयही सुधारते. जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रायनोलॉजी अॅण्ड मेटॅबोलझिमने केलेल्या संशोधनानुसार 500 मिली. पाण्यामुळे चयापचय 30 टक्क्यांनी सुधारते.

काही शहरांमध्ये जड पाणी असते. अशा ठिकाणी पाणी शुद्ध करून वापरायला हवे. यासाठीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे 10 मिनिटे पाणी उकळवणे. जिथे पाणी उकळणे शक्य नसेल तिथे ग्राहकांनी पाण्याचा नीट अभ्यास करून सुरक्षित पाण्याचे मार्ग शोधायला हवेत. यासाठी नियमितपणे पाण्याच्या दर्जाची तपासणी केली जायला हवी. यामुळे तुम्ही आरोग्यदायी, हायड्रेटेड रहाल आणि तुमची रोगप्रतिकारशक्तीही बळकट राहील.

डेलनाझ चंदुवाडिया
विभाग प्रमुख आणि चीफ कन्सलटंट – डायटेटिक्स, जसलोक हॉस्पिटल

बातम्या आणखी आहेत...