आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Health
  • Doomscrolling Effects; What Is Doomscrolling? | Negative Impact On Mental Health | Corona New Variants | Doomscrolling

6 तास वाईट बातम्या वाचल्यास तब्येत बिघडेल:रक्तदाब, स्थूलता आणि ह्रदयरोगाचा धोका

लेखक: मनीष तिवारी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिसेंबरच्या अखेरिस कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या संसर्गाच्या बातम्या आल्यावर पुन्हा एकदा माध्यमांपासून ते सोशल मीडियावर याची भीती दिसायला लागली.

लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेली दिल्लीतील सपना रात्री अचानकच झोपेतून उठते आणि 24 तास कोरोनाच्याच दहशतीत राहते. म्हणूनच ती मोबाईलवरही कोरोनाबद्दलचीच माहिती शोधत असते.

कोरोनामुळे जगाचा अंत न होवो या फोबियाला ती बळी पडली आहे. या सवयीने त्रस्त होत तिचे कुटुंब तिला समुपदेशकांकडे घेऊन गेले. तेव्हा कळाले की ती डूमस्क्रोलिंगला बळी पडली होती.

काय आहे डूमस्क्रोलिंग?

आता तुमच्या मनात विचार आला असेल की, डूमस्क्रोलिंग ही काय समस्या आहे. डूमस्क्रोलिंग हा डूम आणि स्क्रोलिंग या दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे. डूमचा अर्थ आहे विनाश आणि स्क्रोलिंग म्हणजेच संगणक किंवा मोबाईलची स्क्रिन स्क्रोल करणे. याला डूमसर्फिंगही म्हणतात.

डूमस्क्रोलिंगचा अर्थ आहे सोशल मीडिया आणि वेबसाईटवर सतत वाईट बातम्या शोधून वाचणे. या बातम्यांनी मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. या बातम्या वाचल्याने शरिरात असे हार्मोन्स निर्माण होतात, जे रक्तदाबापासून ते ह्रदयरोगाचा धोका वाढवतात. डूमस्क्रोलिंग एक कृष्णविवर आहे, जे आनंद, आशा आणि सकारात्मकता गिळंकृत करते.

6 तास निगेटिव्ह न्यूजने अतीव तणावाचा धोका 9 पट जास्त

कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक ई एलिसन यांच्या अहवालानुसार दररोज 6 तासांपेक्षा जास्त वेळ निगेटिव्ह न्यूजमध्ये गुंग राहणाऱ्यांत अती तणावाचा धोका 9 पटीने वाढतो. इंटरनेट किंवा सोशल मीडियावर 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घारवणाऱ्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडू लागते. त्यातही जर ते यादरम्यान केवळ निगेटिव्ह बातम्यांवरच फोकस करत असतील तर ते डूमस्क्रोलिंगच्या विळख्यात सापडू शकतात.

कान्सास विद्यापीठातील प्रा. जेफ्री हॉल यांचे संशोधनही हेच सांगते की, स्मार्टफोनवर जितका जास्त वेळ घालवला, तितकाच डूमस्क्रोलिंगचा धोका वाढतो.

म्हणून डूमस्क्रोलिंगपासून बचाव खूप गरजेचा आहे...

2020 मधील 'वर्ड ऑफ द इअर' राहिला डूमस्क्रोलिंग

या शब्दाचा वापर सर्वप्रथम 2018 मध्ये ट्विटरवर झाला होता. मात्र कोरोना आल्यानंतर गेल्या 3 वर्षांपासून हा शब्द चर्चेत आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि मॅक्वेरी डिक्शनरीत याला 2020 चा वर्ड ऑफ द इअर घोषित करण्यात आले.

बॅड न्यूज आपल्याकडे खेचून घेतात

ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अवनी तिवारींनुसार अनेकदा लोक माहिती गोळा करण्यासाठी निगेटिव्ह न्यूज बघायला लागतात. क्राईम शोही यासाठीच जास्त पाहतात. त्यांना वाटते की यामुळे ते सतर्क राहतील आणि गरज पडल्यास स्वतःचा बचाव करू शकतील. मात्र हळू हळू अशा बातम्यांची सवय त्यांना होते.

जर्नल हेल्थ कम्युनिकेशनच्या एका रिपोर्टनुसार निगेटिव्ह न्यूज स्क्रोल करण्याची सवय अशी लागते की न राहवून व्यक्ती वारंवार अशाच बातम्या वाचतो आणि पाहतो.

अनेक प्रयत्नांनंतरही तो या बातम्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. जशी एखादी निगेटिव्ह न्यूज दिसते, लगेच तिच्यावर क्लिक करतात. नंतर तिच्या तळाशी जाण्यासाठी त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या अँगलच्या बातम्या वाचायला लागतात. संशोधकांनुसार ही सवय मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम करते.

एकदा वाईट बातम्यांच्या जाळ्यात अडकले तर बाहेर पडणे कठीण होते...

तन-मन दोन्हींवर वाईट बातम्यांचा परिणाम होतो

टेक्सास टेक विद्यापीठातील प्राध्यापक ब्रायन यांनी प्रॉब्लेमॅटिक न्यूजचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. या संशोधनातील 74 टक्के लोकांत मानसिक आरोग्याच्या तर 61 टक्के लोकांत शारीरिक आरोग्याच्या समस्या दिसून आल्या.

वाईट बातम्या वाचणाऱ्या 16.5 टक्के लोकांवर खूप वाईट परिणाम झाला. हे सर्व लोक खूप जास्त तणाव आणि चिंतेचे बळी होते आणि त्यांचे आरोग्यही खराब होते.

27.3 टक्के लोकांवर मध्यम पातळीचा आणि 27.5 टक्के लोकांवर किरकोळ परिणाम दिसला. केवळ 28.7 टक्के लोकांनीच कोणताही त्रास नसल्याचे सांगितले. एकूणच असे दिसून आले की, जे लोक जास्त वाईट बातम्या वाचत होते, त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर तितकाच वाईट परिणाम दिसून आला.

कुणी लावली डूमस्क्रोलिंगची सवय?

डॉ. अवनी तिवारी सांगतात की, कोरोनानंतर जगभरात डूमस्क्रोलिंगची सवय वेगाने वाढली. घरात कैद लोक इंटरनेटच्या माध्यमातून बाहेरच्या जगाची क्षणाक्षणाची स्थिती जाणून घेऊ लागले. रुग्णांची संख्या किती वाढली? कुठे किती लोकांचा मृत्यू झाला, स्मशानात अंत्यसंस्कारासाठी रांगा कशा लागल्या, अशा बातम्यांनी प्रत्येकाच्याच मनावर खोलवर परिणाम केला. यादरम्यान निगेटिव्ह बातम्या वाचण्याची जी सवय लागली ती आजपर्यंत सुटली नाही.

कधी रशिया-युक्रेन युद्ध, तर कधी श्रद्धा हत्याकांड. कधी नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यानच रस्ते अपघातात बळी ठरलेली अंजली. इंटरनेटवर प्रत्येक क्षणाला अशा वाईट बातम्या येत आहेत. ज्यांच्यापासून सुटका मिळणे कठीण आहे. नैराश्य निर्माण करणाऱ्या या बातम्यांना अंत नाही.

डूमस्क्रोलिंगच्या जाळ्यात कुणी कसे अडकते, हेही जाणून घ्या...

डूमस्क्रोलिंगची 9 कारणे

अस्वस्थता आणि चिंता असूनही लोकांना निगेटिव्ह बातम्या स्क्रोल करणे, वाचण्याची तल्लफ जाणवते. याची मोठी कारणेः

वाईट बातम्यांकडे कलः वाईट घटनांकडे लक्ष देणे, त्यातून शिकणे, नंतर त्या अनुभवाचा वापर करण्याची प्रवृत्ती मानवात जन्मतःच असते. मात्र, जेव्हा आपण समतोल किंवा सकारात्मक गोष्टींऐवजी निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष देऊ लागतो, तेव्हा निगेटिव्हिटी आपल्यावर वरचढ ठरते.

सोशल मीडियाचे गणितः मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजीव मेहता सांगतात की, इंटरनेटवर तुम्ही जसे व्हिडिओ बातम्या पाहतात, तसाच कन्टेन्ट तुम्हाला मिळतो. याचे कारण आहे वेबसाईट आणि अॅप्सचे अल्गोरिदम. सोशल मीडियावर निगेटिव्ह पोस्ट जास्त लोकांचे लक्ष वेधून घेतात. त्या वेगाने व्हायरल होतात आणि लोक त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

मागे पडण्याची भीतीः दुसऱ्यांपेक्षा मागे राहण्याच्या भीतीने जास्तीत जास्त माहिती गोळा करत राहतात. व्हर्जिनिया विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्रा. बेथनी टिचमॅन यांच्यानुसार ही भीती त्यांना निगेटिव्हिटीकडे घेऊन जाते.

चिंताः अनेकदा लोक अस्वस्थतेपासून सुटका मिळवण्यासाठी डूमस्क्रोलिंग सुरू करतात. मात्र त्यांच्या चिंता कमी होण्याऐवजी वाढू लागतात.

अनिश्चितताः अनेकदा आपल्यासमोर काही गोष्टी स्पष्ट नसतात. यामुळे अनिश्चिततेची स्थिती निर्माण होते. बॅकमन इन्स्टिट्यूट फॉर अॅडव्हान्स्ड सायन्स अँड टेक्नोलॉजीचे संशोधक जेकब फिशर सांगतात की यामुळे आपल्या मनात द्वंद्व सुरू होते. अशा स्थितीत डूमस्क्रोलिंगला चालना मिळते.

स्वयं नियंत्रणाचा अभावः सोशल मीडियाच्या जास्त वापरापासून स्वतःला थांबवू न शकण्याची सवय डूमस्क्रोलिंगचे व्यसन वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावते.

सुरक्षेची तयारीः धोका जाणवल्यावर प्रत्येक जण माहिती गोळा करायला लागतो. यासाठी तो धोक्याशी संबंधित निगेटिव्ह बातम्या वाचू लागतो.

उत्तेजित करणारा कन्टेन्टः सामान्यपणे निगेटिव्ह बातम्या आणि त्यांच्या हेडलाईन्स लोकांना बातमी वाचण्यास प्रवृत्त करतील अशा उत्तेजित पद्धतीने लिहिलेल्या असतात.

स्मार्टफोनचे व्यसनः डूमस्क्रोलिंगपासून सुटका मिळवणे खूप कठीण असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही रस्त्यात एखादा अपघात बघितला तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. निगेटिव्ह बातम्यांचेही असेच असते. जर एखाद्याला स्मार्टफोनचे व्यसन आहे, तर त्याला निगेटिव्ह बातम्यांपासून दूर राहणे आणखी कठीण होते.

जुगाराच्या व्यसनासारखे आहे डूमस्क्रोलिंग

अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जेड वू आपल्या रिपोर्टमध्ये सांगतात की, डूमस्क्रोलिंग जुगाराच्या व्यसनासारखे काम करते. जसे जुगारात एकदा हरल्यानंतर तुम्ही वारंवार याच आशेने पैसे लावतात की कदाचित पुढच्या वेळेस जिंकाल. डूमस्क्रोलिंगही असेच असते. तुम्ही चांगल्या बातमीच्या आशेने एकामागोमाग एक वाईट बातम्या वाचतात आणि वाईट बातम्या तुम्हाला निगेटिव्हिटिने भरून टाकतात.

वाईट बातम्या वाचण्याच्या व्यसनापासून सुटकेसाठी या गोष्टी लक्षात ठेवा...

रागीट लोकांना जास्त धोका, संपूर्ण जग वाईट वाटू लागते

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजीव मेहता सांगतात की, दुसऱ्यांच्या तुलनेत चिडचिडे, रागीट आणि भावनिकरित्या अस्थिर लोक डूमस्क्रोलिंगच्या विळख्यात सापण्याचा धोका सर्वाधिक असतो. याला बळी पडलेले लोक जगाकडे नेहमी धोकादायक, नैराश्याच्या दृष्टीने बघतात. त्यांना हे असे ठिकाण वाटू लागते, जिथे चहूकडे अंधार आहे आणि आशेचा एकही किरण नाही.

नेहमी हायपर अॅक्टिव्ह असतात डूमस्क्रोलर

ब्रेकिंग न्यूजवर नजर ठेवणे, निगेटिव्ह न्यूज वाचण्याची सवय डूमस्क्रोलरला मानसिकदृष्ट्या हायपर अॅक्टिव्ह बनवते. डूमस्क्रोलिंगच्या व्यसनाची चक्कर एकदा सुरू झाल्यावर त्यातच फसून राहतात.

आपल्या इमोशनल डिस्ट्रेसपासून वाचण्याच्या आशेने ते प्रत्येक ब्रेकिंग, नोटिफिकशन चेक करतात. त्यांना वाटते की यामुळे त्यांना चांगले वाटेल. मात्र याचा त्यांच्यावर वाईट परिणाम होतो.

डूमस्क्रोलिंगमुळे येणारा तणाव आजारांचे कारण

डूमस्क्रोलिंगच्या तणावाने शरीरात एड्रिनेलिन आणि कार्टिसोलसारखे स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात. हे हार्मोन्स धोक्यापासून वाचण्यासाठी व्यक्तीला सतर्क करण्याचे काम करतात.

डोळे, नाक अशी ज्ञानेंद्रिये सक्रीय होतात. याचा परिणाम अनेक तास राहतो. डोकेदुखी, रक्तदाब, स्नायूंमध्ये तणाव, नैराश्य, खूप थकवा, ह्रदयाचे आजार, अस्थमा, मधुमेह आणि पोटाशी निगडित आजार, जनरलाईज्ड एंक्झायटी डिसऑर्डर व्हायला लागते. वजन वाढते, प्रतिकारशक्ती कमजोर होते आणि लैंगिक आयुष्यावरही याचा परिणाम होतो.

निगेटिव्ह न्यूजच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांत दिसतात ही लक्षणे...

डूमस्क्रोलर्स आणि न्यूज जंकीज वेगवेगळे

तज्ज्ञ सांगतात की, न्यूज जंकीज आणि डूमस्क्रोलर्समध्ये फरक असतो. जगातील घटनांची माहिती मिळवण्यासाठी वर्तमानपत्र वाचणे, न्यूज चॅनल पाहणे किंवा सोशल मीडियाशी जोडलेले राहणाऱ्यांसाठी न्यूज जंकी टर्मचा वापर होतो. तर डूमस्क्रोलर्सचा फोकस केवळ निगेटिव्ह बातम्यांवरच असतो.

आता अखेरीस हे जाणून घ्या की डूमस्क्रोलिंगपासून कशी सुटका मिळवता येते. तुम्हाला हे ठरवायचे आहे की निगेटिव्ह बातम्या वाचायच्या नाही. पॉझिटिव्ह बातम्या जास्त वाचा. मोबाईलवर कमी वेळ घालवा. आजुबाजूच्या गोष्टींवर लक्ष द्या. कुटुंब आणि मित्रांसोबत जास्त वेळ घालवा. व्यायाम करा. मनासह तनही निरोगी राहील.

जर्नल ऑफ सोशल अँड क्लिनिकल सायकोलॉजीनुसार रोज 20 ते 30 मिनिटेच सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. जेणेकरून मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही.

ग्राफिक्सः सत्यम परिडा

बातम्या आणखी आहेत...