आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही अन्नपदार्थ वेगवेगळ्या अवयवांसाठी महत्त्वाचे असतात, म्हणून त्यांना म्हणतात सुपर फूड, ते कार्यप्रणाली सुधारतात
शरीराच्या प्रत्येक अवयवाचे वेगळे महत्त्व आहे आणि म्हणूनच त्याचे आरोग्य महत्त्वाचे. निसर्गात प्रत्येक अवयवासाठी विशेष अन्न आहे, जे त्याच्या गरजा पूर्ण करतात. या सुपर फूडचा आहारात समावेश करा. ते तुम्हाला आरोग्याच्या शिखरावर नेऊ शकते-
हृदय
सफरचंद आणि बेरी रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यास सर्वाधिक सक्षम
डॅश आहार हृदयासाठी सर्वोत्तम आहे. त्यात भाज्या, फळे आणि कडधान्य यांचे संतुलन असते. सफरचंद आणि बेरीदेखील लाभदायक आहेत. त्यात अँटिऑक्सिडंट असतात. सफरचंदाच्या सालीमध्ये शक्तिशाली फायबर असते, ते हृदयातून रक्त पंप करणाऱ्या धमन्या स्वच्छ करते. त्यामुळे हृदय निरोगी राहते.
डोळे
ब्रोकोलीतून मिळते ल्युटिन, ते नैसर्गिक दृष्टीचे उत्तम संरक्षक
ल्युटिन एक शक्तिशाली कॅरोटिनॉइड आहे, जे नैसर्गिक दृष्टी संरक्षक म्हणून ओळखले जाते. ते डोळ्यांना नुकसान करणारा निळा प्रकाश फिल्टर करते, आणि डोळ्यातील पडद्याचे नुकसान टाळते. पालक, ब्रोकोली आणि स्प्राउट्समध्ये हे भरपूर प्रमाणात असते. या भाज्या ५० ते ६० ग्रॅम रोजच्या आहारात खाव्यात.
मेंदू
जवस, सोयाबीन, राजमा यामध्ये ओमेगा ३ असल्याने मेंदू होतो तल्लख
निरोगी आणि तल्लख मेंदूसाठी तुमच्या आहारात चिया सीड्स, फ्लेक्ससीड्स, सोयाबीन, राजमा, सॅल्मन, ट्यूना, सार्डिन फिश इत्यादींचा समावेश करा. वास्तविक त्यामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स आढळतात. मेंदूचा ६० टक्के भाग फॅटचा असतो. यातही सुमारे ३० टक्के फॅट ओमेगा ३ ने बनलेले असते.
त्वचा
गाजर, टोमॅटो, भोपळा त्वचेतील बॅक्टेरिया बाहेर टाकतात
व्हिटॅमिन ए हे आपल्या त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेले अँटिऑक्सिडेंट आहे. हे त्वचेचे पीएच संतुलित करते. त्वचेतून बॅक्टेरिया काढून टाकते. पिवळ्या आणि हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. गाजर, भोपळा, टोमॅटो, पपई यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
लिव्हर
कांदे, लसूण सुधारतात यकृताची कार्यक्षमता
हे शरीराचे मास्टर फिल्टर आहे, त्याचे काम रक्त स्वच्छ करणे, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे हे आहे. कांदे, लसूण इत्यादी सल्फर असलेले पदार्थ यकृताची कार्यक्षमता सुधारतात. याशिवाय लिंबू, संत्री यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये आढळणारे सायट्रिक अॅसिड त्याची फिल्टरिंग क्षमता वाढवते.
किडनी
पालेभाज्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात
किडनीचे काम रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकणे आहे. किडनीसाठी स्वच्छ पाणी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये आढळणारी जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरमुळे त्याचे काम सोपे होते. सफरचंदात आढळणारे पेक्टिन नावाचे फायबर यासाठी खूप फायदेशीर आहे.
रक्त
खजूर, बीटरूट स्नायूंच्या ऊतींपर्यंत रक्त प्रवाह वाढवते
गूळ, हरभरा, शेवगा हे लोहाचे उत्तम स्रोत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोहाच्या शोषणासाठी व्हिटॅमिन-सी खूप महत्त्वाचे आहे. दुसरीकडे बीटरूटचा आहारात समावेश केला तर ते रक्तासाठी सुपर फूडसारखे आहे. त्यात मोठ्या प्रमाणात नायट्रेट असते, त्यामुळे स्नायूंच्या ऊतींमध्ये रक्तप्रवाह वाढतो.
स्नायू
सोयाबीन लाभदायक, उच्च प्रथिनयुक्त आहार घ्या
पन्नाशीनंतर स्नायूंच्या वस्तुमानात दरवर्षी १ ते २% घट होते. यासाठी बीन्स खूप लाभदायक आहेत. यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे व वनस्पती-आधारित प्रथिने आणि कमी चरबी असते. ट्यूना आणि सॅल्मन मासे लाभदायक आहेत. त्यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते, ते पॉली अनसॅच्युरेटेड फॅट असते.
हाडे
दूध आणि पालेभाज्या हे कॅल्शियमचे चांगले स्रोत
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम असते, त्यामुळे हाडे मजबूत होतात. यासोबतच ब्रोकोली, कोबी, भेंडी, नाचणी इत्यादी पालेभाज्यांचा आहारात नक्कीच समावेश करा. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन केदेखील त्यात आढळतात. अंडीही लाभदायक असतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.