आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानव्या वर्षात अनेकांनी फिटनेसबाबत संकल्प केले असतील. मात्र स्वत:बाबत कठोर राहिलात नाही तर हे संकल्प महिनाभरातच विरतील. तज्ज्ञांनुसार, आपण ध्येयपूर्तीत सहायक ठरतील अशी उद्दिष्टे ठेवली पाहिजेत. मध्यमवय म्हणजे वयाच्या चाळिशीत आपल्या आरोग्याबाबत अनेक उद्दिष्टांवर काम करण्याची गरज असते. त्यात या ६ पद्धती फायदेशीर ठरू शकतात.
१. बिया निरोगी ठेवतील : बियांत पचनासाठी आवश्यक पिष्टमय पदार्थ, प्लांट प्रथिने, खनिजे व फाइटोन्यूट्रियंट्स असतात. सूर्यफुलाच्या बियांत हाडांसाठी फाॅस्फरस व मँगनीज असते. भोपळ्याच्या बियांतील झिंकमुळे प्रोस्टेट व युरिनरी आरोग्य उत्तम राहते. तिळात मॅग्नेशियम व ई जीवनसत्त्व धमन्यांसाठी चांगले आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलनुसार, रोज २ मोठे चमचे बिया खाल्ल्याने मृत्यूच्या जोखमीत १०% व कोरोनरी धमन्यांच्या आजारांत ११% घट होते.
२. दह्यामुळे बीपी नियंत्रण : ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील अॅलेक्झांड्रा वेडनुसार, दह्यातील जिवंत जिवाणू प्रथिने स्रवण्यात मदत करतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात आणण्यास मदत मिळते. रोज १५० ते २०० ग्रॅम साधे दही खावे.
३. स्लीप ट्रॅकरची मदत घेऊ नका : या वयात हार्मोनल बदलांचा निद्रेच्या पॅटर्नवर परिणाम होतो. यामुळे स्लीप ट्रॅकरची मदत घेऊ नका. ही उपकरणे हृदयगतीत बदलांसह किती वेळ झोपलो या डेटा देतात. तुम्ही किती गाढ झोपलात, याची हे ट्रॅकर्स ३८ टक्केच अचूक नोंद घेऊ शकतात. ऑक्सफर्ड विद्यापीठातील निद्रातज्ज्ञ डॉ. नील स्टेनलींनुसार, झोपेवर लक्ष दिल्यास चिंता वाढते. यामुळे झोप आणखीच कमी होते. या ट्रॅकर्सविना तुम्ही चांगले झोपू शकता.
४. रात्री उशिरा जेवणे बंद करा : संध्याकाळी ६-७ वाजेनंतर जेवण करणे टाळा. रात्री उशिरा जेवल्याने ग्लुकोज टॉलरन्स बिघडतो, फॅट बर्न कमी होतो. यामुळे रक्तातील शर्करा वाढते. परिणामी मधुमेहासारखे आजार जडतात..
५. व्हिटामिन डी सप्लिमेंट सुरू करा : याच्या कमतरतेमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका इतरांच्या तुलनेत दुप्पट असतो. ऑस्ट्रेलियन आरोग्यतज्ज्ञ एलिना हाइपोननुसार,‘वेळेअभावी आजकाल उन्हातून आपण ड जीवनसत्त्व मिळवू शकत नाही. यामुळे सप्लिमेंट उत्तम पर्याय आहे.’
६. दिवसभरात ५ वेळा भाज्या-फळे खाल्ल्यास आजार जडणार नाही
अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, दिवसभरात ५ वेळा खाल्ले पाहिजे. पैकी ३ वेळा भाज्या व २ वेळा फळे खाल्ली तर पुरेशा प्रमाणात पोषक तत्वे मिळतात. यामुळे गंभीर आजारांची जोखीम घटते. यात हिरवी पालक, सॅलड पाने, बीटा कॅरोटिनयुक्त भाज्या व आम्लवर्गीय फळे आवश्यक आहेत. धावण्याचा फायदा आहेच. रोज किमान २००० पावले चालले तरी मृत्यूची जोखीम ३२ टक्क्यांपर्यंत कमी होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.