आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायग्रेन जागरूकता महिना:जगातील दर 7 पैकी एका व्यक्तीला मायग्रेन, भावना व्यक्त करणे व लयबद्ध श्वास घेतल्यास त्वरित आराम

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका अंदाजानुसार, १०० कोटींहून अधिक लोक म्हणजे दर ७ पैकी एक जण मायग्रेनने त्रस्त आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांना मायग्रेन होण्याची शक्यता तिप्पट असते. मायग्रेनने ग्रस्त असलेल्या दर १० लोकांपैकी ८ महिला आहेत. इस्ट्रोजेन या संप्रेरकातील बदलांमुळे महिलांना मायग्रेनचा त्रास अधिक होतो. चिंतेची बाब म्हणजे १० पैकी नऊ जणांच्या दैनंदिन दिनचर्येवर याचा वाईट परिणाम होतो. ते अजिबात काम करू शकत नाहीत. अनेकांना मायग्रनेचा त्रास होण्यापूर्वी एक ते दोन दिवस आधी बद्धकोष्ठता, मानदुखी, वारंवार मूड बदलणे, वारंवार लघवी होणे, जांभई येणे आणि डोळ्यांसमोर अंधारी येणे, बोलण्यास त्रास होणे, हात-पायांमध्ये सुया टोचल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे ओळखून वेदना टाळण्यासाठी उपाय करता येतात.

आपल्याला माहीत असणे गरजेचे असलेले मायग्रेनबद्दल सर्व काही
मायग्रेन म्हणजे काय? ही न्यूराॅलॉजिकल समस्या

हा मेंदू किंवा मज्जातंतूंवर परिणाम करणारा एक आजार आहे. डोकेदुखी, उलट्या, नाकातून पाणी येण्याबरोबरच प्रकाश आणि आवाजाच्या समस्याही होऊ लागतात. मायग्रेन हा बऱ्याचदा क्रॉनिक असतो, म्हणजे एकदा त्रास झाला की त्याची समस्या वर्षानुवर्षे टिकते.

कारणे काय? चुकीची दिनचर्या, कमी झोपही कारण
वेगवेगळ्या व्यक्तींसाठी मायग्रेनची कारणे वेगवेगळी असू शकतात. असे असूनही यासाठी अनेक सामान्य कारणे आहेत, त्यांना ट्रिगर म्हणतात. चमकता प्रकाश, हवामानातील बदल, दिनचर्येत बदल, जेवणाच्या वेळेत बदल, निर्जलीकरण, तीव्र वास आणि हार्मोनल बदल यामुळेदेखील मायग्रेन होऊ शकतो.

याचे प्रकार किती? याचे दोन प्रकार आहेत
पहिला : आभेसह मायग्रेन. त्यात चेहऱ्यावर डाग किंवा मुंग्या येतात. ही वेदना २० मिनिटांपासून एक तासापर्यंत असते.
दुसरा : आभेशिवाय मायग्रेन. याचे चार टप्पे आहेत. यामुळे डोक्याच्या एका बाजूला जास्त वेदना होतात. नाक वाहणे, उलट्या होणे, मान आखडणे यांसारख्या समस्या आहेत. याची वेदना अनेक दिवस टिकते.

मायग्रेनव्यतिरिक्त डोकेदुखीचे ३ प्रकारही आहेत
तणाव : यामध्ये हळूहळू वेदना वाढत जातात. डोक्याच्या मागे वा समोर वेदना जाणवते. हे ३० मिनिटे ते ७ दिवस टिकू शकते.
क्लस्टर : तीव्र डोकेदुखी होते. वेदना अधूनमधून होते. पीडिताला अस्वस्थ वाटते. अमली पदार्थांचे व्यसन हे प्रमुख कारण आहे.
सायनस : रुग्णाच्या डोळ्यांभोवती, वर वेदना होतात. या दुखण्यामुळे तापही येतो. नाक बंद होते. चेहऱ्यावर दाब जाणवतो.

वेदनांवर हे उपाय प्रभावी
जीवनशैलीतील बदलांव्यतिरिक्त काही पद्धती मायग्रेनच्या वेदनांपासून जलद आराम देतात.
तत्काळ आराम मिळण्यासाठी :
-डोळे बंद करून थंड पाण्याने अंघोळ करा.
-१० मिनिटे थंड पाण्याने स्पंजिंग करा. दर ३० मिनिटांनी पुनरावृत्ती करा.
- बोला, दडपलेल्या भावना बाहेर काढा.
-मायग्रेनला चालना देणाऱ्या चमकता प्रकाश, आवाज इ. गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा.
दीर्घकालीन आरामासाठी
-लयबद्ध श्वासोच्छ्वास : १ ते ५ मोजत श्वास घ्या. ५ पर्यंतच मोजत श्वास सोडा. श्वास सोडताना शरीराला मिळणाऱ्या आरामाकडे लक्ष द्या. वेदना वेगाने कमी होईल.
-श्वासोच्छ्वासाचे कल्पनाचित्र : डोळे मिटून शांत ठिकाणी बसा. आता श्वास घेताना कल्पना करा की तुमचे शरीर आराम करत आहे आणि तणाव दूर होत आहे. दीर्घ श्वास घ्या, परंतु जास्त जोर लावू नका. श्वास घेताना तो नाकातून फुप्फुसापर्यंत आणि नंतर छाती व पोटापर्यंत जात असल्याचे जाणवते. अशाच प्रकारे तो बाहेर येताना जाणवते.

डॉ. मनीष वैश्य
संचालक, न्यूरो सर्जरी विभाग, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, वैशाली, गाझियाबाद

बातम्या आणखी आहेत...