योगा / सेतुबंधासन करून ठेवा डोके शांत आणि राहा तणावमुक्त

  • चिडचिड होत असेल किंवा घरी राहून कंटाळा आला असेल तर सेतुबंधासन करून डोके शांत ठेवा आणि ताण घालवा....

दिव्य मराठी

May 09,2020 11:09:00 AM IST

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकारने पुन्हा लाॅकडाऊन १७ मेपर्यंत वाढवले आहे. त्यामुळे अनेकांची चिडचिड होत असेल किंवा घरी राहून कंटाळा आला असेल तर सेतुबंधासन करून डोके शांत ठेवा आणि ताण घालवा. सेतू म्हणजे पूल. या आसनस्थितीत शरीराचा आकार हा पुलासारखा दिसतो. म्हणून त्याला सेतुबंधासन असे म्हणतात.


कसे करावे

पाठीवर सरळ झोपावे. शरीर एका रेषेत असावे. आता हळुवारपणे पायांना गुडघ्यातून वाकवावे. दोन्ही हात शरीरालगत असावेत. आता हळुवारपणे पोटाला वर उचलून वाकवावे. काही सेकंद या आसनस्थितीत राहावे. नंतर हळुवारपणे पोटाला खाली आणावे. श्वास घेत पोटाला पुन्हा वर घ्यावे. आसनस्थितीत नियमित श्वासोच्छ्वास घ्यावा. श्वास सोडत पोटाला खाली आणावे. दहा आकडे मोजेपर्यंत या आसनात थांबावे.


फायदे

- ज्या व्यक्तींना पाठीचा आणि कंबरेचा त्रास आहे त्यांनी हे आसन आवर्जून करावे.

- या आसनाने छाती, मान आणि कण्याला ताण मिळतो.

- डोके शांत होते. ताण कमी होतो.

- अस्थमा असलेल्यांनी हे आसन करावे.

- या आसनाने पचनक्रिया चांगली होते.


खबरदारी

सेतुबंधासन आसन करताना पोटाला जास्त वर आणू नये. पोटाला वर नेताना हळुवारपणे वर न्यावे, झटका मारू नये. पोटाला खाली आणताना हळुवारपणे आणावे. पटकन खाली आणू नये. पोटाला वर नेताना पायांचे तळवे हे जमिनीला स्पर्श केलेले असावे. हे उचलू नये. त्याचबरोबर दोन्ही हात शरीरालगत असावेत.

X