कोरोना काळजी / फ्रिजमधील पाणी आणि पदार्थ शरीरासाठी नुकसानदायक

  • थंड पाण्यामुळे आणि पदार्थांमुळे निर्माण होऊ शकतात पुढील समस्या

दिव्य मराठी

May 07,2020 12:10:00 AM IST

जगभरात कोरोना विषाणुचा संसर्ग पसरला आहे. देश, राज्य आणि शहरातही याचे रुग्ण दिवसेदिवस वाढतच चालले आहेत. त्यातच सारी सारख्या रोगाने शहराला विळखा घातला आहे. त्यामुळे प्रत्येकाने जास्त काळजी घेणे गरजेचे आहेे. आता उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे प्रत्येकाची थंड पाणी पिण्याची, थंड खाण्याची इच्छा होते यासाठी आपण फ्रिजमधील पाणी पितो, थंड खातो. मात्र फ्रिजचे पाणी आणि त्यातील पदार्थ शरीरासाठी नुकसानदायक असतात. यामुळे घसा खवखवणे, सर्दीचा त्रास होणे, खोकला, ताप यासारखे आजार होऊ शकतात असे आयुर्वेद तज्ञ डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.


बद्धकोष्ठता : आयुर्वेदात बद्धकोष्ठता हे सगळ्या आजाराचे मूळ मानले जाते. बद्धकोष्ठता तेव्हाच होते जेव्हा आपली पचनशक्ती कमी होते. फ्रिजचे थंड पाणी प्यायल्याने किंवा थंड पदार्थ खाल्ल्यामुळे आतडे आंकुचन पावतात आणि जेवण नीट पचत नाही. पोटातील जेवण वारंवार न पचल्याने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.


सतत सर्दी-खोकला होणे : घरातील जाणती लोकं, फ्रिजऐवजी माठातले पाणी प्यायचा सल्ला देतात. या मागील खास कारण म्हणजे फ्रिजचे पाणी किंवा फ्रिजमधील फळे, पदार्थ हे नैसर्गिकरीत्या नाहीतर कृत्रिमरीत्या थंड होतात. जे आपल्या शरीराच्या प्रतिकारक्षमतेला नुकसानकारक असते. फ्रिजमधील थंड पाणी किंवा पदार्थ खाल्ल्यामुळे छातीत कफ जमा होतो, ज्यामुळे आपली प्रतिकारक्षमता कमी होते आणि आपल्याला लगेच सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागतो.


हृदयासाठी धोकादायक : जेव्हा आपण थंड पाणी पितो त्यावेळी आपल्या शरीरातील शिरा थंड होऊन हृदयाच्या ठोक्यांचा वेग कमी होताे. जे आपल्या हृदयाच्या कार्यासाठी योग्य नाही. ही कार्निव्हल नर्व्ह आपल्या मानेपासून हृदय, फुफ्फुस आणि पचनसंस्था नियंत्रणात आणते.


टॉन्सिल्सचा त्रास : जर तुम्ही रोज फ्रिजचे थंड पाणी आणि पदार्थ खात असाल तर तुमचे टॉन्सिल्स वाढू शकतात. याशिवाय फुफ्फुस आणि पचनाशी निगडित आजारही होऊ शकतात. त्यामुळे फ्रिजऐवजी माठातलं किंवा साधं पाणी प्यावं.


वजन वाढणे : जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी कष्ट घेत असाल आणि सोबतच थंड पाणी, पदार्थ खात असाल तर तुमचे वजन कमी होणे शक्यच नाही. तज्ज्ञांनुसार फ्रिजमधील थंड पाणी प्यायलाने किंवा खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात साठलेला फॅट अजूनच कडक होतो त्यामुळे जेवल्यानंतर कमीत कमी अर्ध्या तासाने पाणी प्या आणि तेही साधं पाणी.


कोरोना काळजी : या दिवसांत थंड पाणी आणि थंड पदार्थांचे सेवन करणे टाळावे. शक्यतोवर काेमट पाणी प्यावे. फ्रिजमधील पदार्थ काही वेळ बाहेर काढून त्यांचा थंडपणा कमी झाल्यावर खावे.

X