आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग दिन विशेष:मन व शरीर परिपूर्ण करणारी 6 योगासने

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पार्श्वोत्तानासन : पचनशक्तीसाठी
फायदे
- पचनशक्ती सुधारते, पाठीचा कणा, नितंब, खांदे आणि मनगटात लवचिकता येते. पाय मजबूत होतात. मेंदू आणि मन शांत होतो.

जमिनीवर सरळ उभे राहा. डावा पाय उजव्या पायाच्या मागे किमान दोन फूट ठेवा. दोन्ही हात वर करा आणि हळूहळू पुढे वाकायला सुरुवात करा. पुढे वाकत असताना आपला हात पुढे आणण्यास सुरुवात करा. तुमचा चेहरा उजव्या गुडघ्याजवळ येतो तेव्हा तळवे उजव्या पायावर ठेवा. जमल्यास कमरेमागे हात नमस्काराच्या मुद्रेतही आणू शकता. आपापल्या क्षमतेनुसार काही वेळ या योगासनात राहा. आणि मग हळूहळू सामान्य स्थितीत या.

अष्टांग नमस्कार : ८ अंगांवर परिणाम
फायदे
- या योगाने छाती मोकळी होते. फुप्फुसांशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी हे उपयुक्त आहे. हात आणखी मजबूत करते. याच्या नियमित सरावाने पोटाची चरबी कमी करता येते. पायाची बोटे मजबूत होतात. पचनक्रियाही सुधारते.

वज्रासनात बसावे. हात जमिनीवर ठेवा आणि हात पूर्णपणे जमिनीवर येईपर्यंत पुढे जा. शरीराच्या वजनाला आधार देण्यासाठी पाय, गुडघे, छाती, हनुवटी आणि हात जमिनीवर असल्याची खात्री करा. यानंतर पोट जमिनीच्या वर उचलावे. काही काळ या स्थितीत राहा आणि पहिल्या स्थितीत परत या.

आंजनेयासन : शरीर लवचिक होते
फायदे
- फुप्फुसे मजबूत होतात आणि छातीभोवतीच्या स्नायूंना फायदा होतो. शरीरात ऊर्जा जाणवते. शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी या आसनाचा सराव उपयुक्त ठरतो.
वज्रासनामध्ये बसावे. आपला डावा पाय मागे घ्यावा आणि उजवा पाय जमिनीवर ठेवावा. आपले दोन्ही हात डोक्याच्या वर आणाेत आणि जोडावेत. हळूहळू मागे झुकण्याचा प्रयत्न करावा. शक्य होईल तितके हात मागे घ्यावेत. २० ते ३० सेकंदांपर्यंत या स्थितीत राहावे. त्यानंतर सामान्य स्थितीत परत यावे.

उत्तान शिशुनासन : मणक्यासाठी
फायदे
- यामुळे मणक्यांची लवचिकता वाढण्यासही मदत होते. तणाव दूर करते. पाठ आणि खांदे ताणते. मन आणि शरीर शांत करते.
वज्रासनात बसावे. दीर्घ श्वास घेत दोन्ही हात वर करा. हळूहळू श्वास सोडताना पुढे वाकून आपले कपाळ जमिनीवर टेकवा. आता हातांचे तळवेही जमिनीवर ठेवा. आता काही वेळ या आसनात राहून श्वासोच्छ्वास नेहमीप्रमाणे सुरू ठेवा. श्वास घेत वज्रासनाच्या स्थितीत या.

कुक्कुटासन : हात आणि खांद्यांसाठी
फायदे
– हात, खांदे, कोपर मजबूत होतात. फुप्फुसाची क्षमता वाढते. शरीर संतुलित राहते. एकाग्रता वाढते. मन शांत होते.

पद्मासनात बसा. उजवा हात उजवी मांडी आणि उजव्या नडगीच्या मध्ये आणि डावा हात डावी मांडी आणि डाव्या नडगीदरम्यान न्या. हात कोपरापर्यंत खाली घ्या. श्वास घेताना शरीर जमिनीवरून हवेत शक्य तितके वर उचलावे. शरीराचे वजन तळहातावर ठेवा. हळूहळू श्वास आत घ्या. शक्यतोवर ही स्थिती कायम ठेवा. श्वास सोडत हळूहळू पहिल्या स्थितीत या.

आनंद बालासन : मेंदू आणि मनासाठी
फायदे - दोन्ही हात आणि पायांना आराम मिळतो. तणाव, चिंता आणि थकवा दूर करते. पाठीला आराम मिळतो. पाठीच्या खालच्या भागात दुखत असल्यास ते बरे होते. मन शांत राहते. पचनसंस्था निरोगी बनवते.
पाठीवर झोपा. हळूहळू श्वास आत घ्या व सोडा. श्वास सोडत गुडघे छातीच्या दिशेने वाकवा, पायाचे तळवे छताच्या दिशेने असावेत. नितंबांना जमिनीला स्पर्श करू द्या. दोन्ही पायांचे तळवे हाताने पकडा. आता हळूहळू गुडघे पसरताना त्यांना बगलेच्या दिशेने न्या. हळूहळू शरीर एका बाजूला व नंतर दुसरीकडे फिरवा. हे आसन ३० सेकंद ते १ मिनिटापर्यंत करता येते.