आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर जिल्ह्यातील एकूण २३ पैकी १९ कारखान्यांचा गाळप हंगाम पूर्ण झाला आहे. सध्या फक्त ४ सहकारी साखर कारखान्यांतून गाळप सुरू आहे. या ४ कारखान्यांचा अद्याप ११ हजार टन ऊस शिल्लक आहे. आगामी दोन दिवसांत हे गाळप पूर्ण होईल, असा दिलासा प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाने दिला.
अहमदनगर जिल्ह्यातील १४ सहकारी व ९ खासगी कारखान्यांनी ६ जून अखेर सुमारे १ कोटी ८४ लाख ९४ हजार ३२९ टनांचे गाळप करून १ कोटी ८५ लाख १ हजार १५८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. यावर्षी जिल्ह्यातील सहकारी, खासगी कारखान्यांनी विक्रमी गाळप करूनही अद्याप ४ सहकारी साखर कारखान्यांमध्ये ११ हजार टन ऊस उपलब्ध आहे. राहाता तालुक्यातील गणेश कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ७०० टन, संगमनेरच्या थोरात कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १ हजार ८०० टन, श्रीरामपूर तालुक्यातील अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ८ हजार टन, नेवासे तालुक्यातील मुळा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ७०० टन ऊस उपलब्ध आहे. संपूर्ण उसाचे गाळप झाल्यानंतर या कारखान्यांचा गाळप हंगाम बंद होणार आहे.
या कारखान्यांचे गाळप पूर्ण
कोपरगावचा काळे कारखाना, शंकरराव कोल्हे कारखाना, राहुरीतील तनपुरे कारखाना, श्रीगोंद्यातील श्रीगोंदे कारखाना, अकोल्यातील अगस्ती कारखाना, शेवगाव तालुक्यातील केदारेश्वर, भेंडा येथील ज्ञानेश्वर कारखाना, पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर कारखाना, श्रीगोंद्यातील कुकडी, प्रवरानगरचा पद्मश्री विठ्ठलराव विखे, पारनेरचा क्रांती शुगर, नगर तालुक्यातील पियूश, कर्जतचा अंबालिका, शेवगावचा गंगामाई, श्रीगोंद्यातील साईकृपा, साजन शुगर, वांबोरी येथील प्रसाद शुगर, जामखेडचा जय श्रीराम, संगमनेरचा युटेक या कारखान्यांनी आपला हंगाम पूर्ण केला.
अजून २ दिवस कारखाने सुरू राहतील
कार्यक्षेत्रात ऊस उपलब्ध असलेल्या गणेश कारखाना, थोरात, अशोक व मुळा या ४ कारखान्यांचे गाळप अजून दोन दिवस सुरू राहणार आहे. दोन-तीन दिवसांत उर्वरित उसाचे गाळप होईल. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप झाल्याशिवाय हे कारखाने गाळप हंगाम बंद करणार नाहीत, अशी माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.