आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरा:मानाच्या गणबादेव गणेश मंडळाला 118 वर्षांची परंपरा

प्रदीप नरवाडे | पुसदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कै. शेषराव पाटील यांच्या वाड्यासमोर उदासी वार्ड येथील गणबादेव गणेश उत्सव मंडळाची सन १९०५ रोजी स्थापना झाली. त्यावेळी अध्यक्ष दत्तराम पाटील होते. पाटील गल्लीत राहणाऱ्या नागरिकांकडून गजानन पंडितकर यादवराव चौधरी (पाटील) यांनी वर्गणी गोळा करून गणपती बसविला होता. ती परंपरा आजही कायम आहे. पूर्वी पाटलाचा गणपती हा पालखीतून गावात फिरवून स्थापन केला जात होता. जुन्या परंपरेनुसार चालत आलेल्या गणपतीचे आकर्षण कायम असून, यंदा मंडळाला ११८ वर्षे पूर्ण झाले.

मंडळाने गणपतीच्या मूर्तीच्या एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज तर दुसऱ्या बाजूला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे फोटो लावण्याची परंपरा जपण्यास सुरूवात केली आहे.

पाटील गल्लीतील गणपतीची ओळख कायम करणारे त्या वेळेचे मंडळाचे अध्यक्ष कै. शेषराव दत्ताराम पाटील यांच्या पुढाकाराने मुरलीधर पंडितकर, नरहरी पंडितकर, कोत्ता कोंडावार बंधू, नारायण पाटील, वामनराव चौधरी यांनी दहा दिवसांच्या गणेशोत्सवाचे आयोजन केले. त्या काळात समाज कार्यासह, भजने, राम शेवाळकर यांचे प्रबोधन, मोठमोठ्या वक्त्यांची भाषणे, प्रवचन, कीर्तनांचे आयोजन केले जात होते.

पाटलांचा गणपती म्हणून ख्याती प्राप्त झालेल्या गणेश मंडळात तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक, वसंतराव नाईक यांनी सुद्धा सहभाग घेतला होता. स्व. मधुकर पंडितकर, विलास पंडितकर यांनी जून्या काळातील परंपरेचा वारसा जपत लोकवर्गणीतून जमा केलेल्या पैशाचे शेकडो समाजकार्य केले. त्यात उरलेल्या पैशातून गोरगरिबांना मदत केली.

सरफराज यांनी बनवला रथ
स्थापना ते विसर्जनाचा मान भोई समाजालाच आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती आहे. नवस पूर्ण झाल्यावर भक्त नारळ देऊन नवस फेडतात. त्यावेळेस वि. वा. शिरवाडकर यांचे सामाजिक प्रबोधने होत होती. मंडळाला शंभर वर्षे पूर्ण झाले. तेव्हा पालखीची जागा लाकडी रथाने घेतली. तो लाकडी रथ मुस्लिम समाजाच्या सरफराज यांनी बनवून दिला होता.

शासनाकडून पुरस्कार
मानाचा गणपती म्हणून गणबादेव गणेश उत्सव मंडळ आहे. तत्कालीन मंत्री विनोद तावडे यांनी गणबादेव मंडळाचा सन्मान केला होता. लोकवर्गणीतून चांदीचे सिंहासन, मूर्तीला सोन्याचे दात, चांदीचे मोदक बनवले आहेत. कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलिस कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना युद्धांचा सत्कार केला होता.

बातम्या आणखी आहेत...