आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादळण वळणाच्या दृष्टीने राहुरी व श्रीरामपुर या दोन तालुक्याला जोडणारा प्रवरा नदीवरील कान्हेगाव पुलाच्या बांधकामास राज्याचे महसुल व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी १२ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी दिली आहे.
राहुरी श्रीरामपुर तालुक्याला जोडणारा प्रवरा नदीवर पुल असावा, अशी दोन्ही तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी होती. प्रवरा नदीला पाणी असल्यास दोन्ही तालुक्यातील गावांचा संपर्क तुटत होता. केवळ उन्हाळ्यात प्रवरा नदीला पाणी नसेल तरच प्रवरा काठावरील गावांचा संपर्क होत होता. नागरिक प्रवरा नदीवर पुल व्हावा अशी वारंवार मागणी करत होते.
दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करुन आपल्यासह भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे उपसभापती बाळासाहेब तोरणे, रामभाऊ लिप्टे, आदींनी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला, असे नवले म्हणाले.
१ मार्च २०२१ रोजी कान्हेगाव लाख पूल कृती समितीचे अध्यक्ष रणजित बनकर, सरपंच किशोर बनकर, गीताराम खरात, दत्तात्रय आढाव, संदीप गले, जितेंद्र तोरणे, पुष्पराज खरात, दत्तात्रय लिप्टे, रामभाऊ तोरणे, अतुल लबडे, आदींसह पंचक्रोशीतील नागरिकांनी ५५ ट्रॅक्टरसह मोर्चा काढून आमदार डॉ. सुधीर तांबे व आमदार लहु कानडे यांना निवेदन दिले होते. तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला होता, असे रणजित बनकर यांनी सांगितले.
सव्वा कोटींचे काम बारा कोटींवर
रोजगार हमी योजना विभागाने २ सप्टेंबर २००४ च्या एका स्थानिक वर्तमानपत्रात लाख पढेगाव येथील पुलाच्या कामाबाबत १ कोटी २५ लाख रुपयांची निविदा काढली होती. मात्र त्याचे पुढे काय झाले हे समजू शकले नाही. पढेगावच्या माणसाला राहुरीला जायचे असेल तर हे अंतर ३५ किमी पडते. हा पूल झाला तर हे अंतर फक्त १७ किमी पडते. म्हणजे हे अंतर १८ ने कमी होणार आहे.
विधिमंडळात पाठपुरावा केला
कान्हेगाव ते लाख या रस्त्यावर प्रवरा नदीवर पूल व्हावा, ग्रामस्थांची मागणी होती. तरुणांनी त्यासाठी ट्रॅक्टर मोर्चाही आणला होता. या गोष्टींची दखल घेत आपण हा मुद्दा विधानभवनात उपस्थित केला होता. या पुलाचे काम सीआरएफमध्ये प्रस्तावित केले होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने पुलाच्या बांधकामासाठी रुपये १२ कोटी निधी मंजूर झाल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.''लहू कानडे, आमदार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.