आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अनलॉकनंतर शिर्डीतील साईबाबा मंदिर भाविकांसाठी १६ नोव्हेंबरपासून खुले झाल्यानंतर गेल्या ७१ दिवसांत सुमारे १२ लाख २ हजार १६२ भाविकांनी कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करत दर्शन घेतले. विशेष म्हणजे एकही भाविक अथवा संस्थान कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली नाही. या काळात सुमारे ३२ कोटी ३ लाख ४२ हजार ९०० रुपयांचे भरभरून दानही प्राप्त झाले आहे. तसेच दर्शन व्यवस्थेबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
शिर्डीतील दर्शनव्यवस्थेचे तिरुपती देवस्थानच्या अध्यक्षांनीही कौतुक केले आहे. शिर्डी ग्रामस्थांसाठी स्वतंत्र दर्शनाची व्यवस्था आहे. तसेच ग्रामस्थांना अधिक सुकर दर्शन देण्यासाठी दर्शनरांगेत कुठलाही अडथळा येणार नाही याची काळजी घेऊन तीन व चार क्रमांकाचे प्रवेशद्वार खुले करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
शिर्डीत थांबण्याची भाविकांची संख्याही लक्षणीय वाढली असून दुबार दर्शनाला भाविक पसंती देत आहेत. त्याचा लाभ व्यावसायिकांना होत आहे. शिर्डीकर तसेच साईभक्तांसाठी सुसज्ज कोविड रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर आणि अत्यावश्यक सुविधाही आहेत.
१.७१ लाख रुग्णांना रुग्णसेवेचा लाभ
संस्थानच्या साईबाबा व साईनाथ या दोन रुग्णालयांतून १ एप्रिल २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या ९ महिन्यांत सुमारे १ लाख ७१ हजार ७३१ रुग्णांनी रुग्णसेवेचा लाभ घेतला.
१०.४३ लाख साई उदी पाकिटांचे वाटप
७१ दिवसांत भाविकांसाठी १७ लाख साई उदी पाकिटांची निर्मिती करण्यात येऊन त्यातील १० लाख ४३ हज़ार साई उदी पाकिटांचे भाविकांना वाटप करण्यात आले.
भक्तनिवासांत ३.२० लाख भाविक
साई संस्थानच्या साईप्रसाद भक्तनिवास, साईबाबा भक्तनिवास, साईआश्रम भक्त निवास, द्वारावती भक्तनिवास आदी भक्तनिवासांचा सुमारे ३ लाख २० हजार ६३९ भाविकांनी लाभ घेतला.
या पद्धतीने घेतले भाविकांनी दर्शन :
१६ नोव्हेंबर ते २५ जानेवारीदरम्यान ९९ दिवसांत फ्री बायोमेट्रिक दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या ९ लाख १३ हजार ३२५ असून ऑनलाइन पास काढून १ लाख ३ हजार ३७७ भाविकांनी दर्शन घेतले. संस्थानच्या जनसंपर्क विभागातून पेड दर्शन सुविधेचा १ लाख ८५ हजार ४६० अशा एकूण १२ लाख २ हजार १६२ भाविकांनी शिर्डीत दर्शन घेतले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.