आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरला परतीच्या पावसाने झोडपले:जिल्ह्यातील 12 तालुक्यात शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाचा जोर शुक्रवार (7 ऑक्टोबर) दिवसभर कायम होता. शहरात दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम व संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुका वगळता अन्य बारा तालुक्यात शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. शहरावर शुक्रवारी ढगाचे सावट होते.

अहमदनगर शहर व जिल्ह्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा सरासरी पावसापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान 448 मिलिमीटर पावसाची असताना यंदा 7 ऑक्टोबर अखेरपर्यंत 609 मिलिमीटर पाऊस झाला आहे. अहमदनगर शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर गुरुवारी मध्यरात्रीपासून पुन्हा सुरू झाला आहे. मध्यरात्री सुरू झालेला पाऊस सकाळी देखील काही प्रमाणात सुरू होता. दुपारनंतर पुन्हा परतीच्या रिमझिम पावसाला सुरुवात झाली. अहमदनगर शहरात सुरुवात असलेल्या या पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर व चौका पाणी साचलेले आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात असलेल्या प्रमुख धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यात मुळा, ओझर बंधारा, भीमा, नांदूरमध्यमेश्वर, गोड, सीना या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग सुरू आहे.

131 टक्के पावसाची नोंद

अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत 131 टक्के पावसाची नोंद झाली आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका पिकांना देखील बसला असून, सर्वाधिक नुकसान हाती आलेल्या मुगाच्या पिकांचे झाले आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात या पावसामुळे मुगाचे पीक सडून गेले आहे.

विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे सुरू असतानाच या परतीच्या पावसाने पुन्हा पिकांवर घाला घातला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने अहमदनगर जिल्ह्यात पुढचे दोन दिवस आणखी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान अहमदनगर शहरासह जिल्ह्यात गेल्या 24 तासात 25 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

आतापर्यंत झालेला पाऊस

अहमदनगर 123, पारनेर 132, श्रीगोंदे 144, कर्जत 132, जामखेड 89, शेवगाव 124, पाथर्डी 104, नेवासे 138, राहुरी 130, संगमनेर 149, अकोले 176, कोपरगाव 155, श्रीरामपूर 117, राहता 127 टक्के आतापर्यंत पाऊस झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...