आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनवाबनवी:मनपाला 1.42 कोटी रुपयांना फसवले; स्वयंभू ट्रान्सपोर्ट विरोधात गुन्हा दाखल ; गिरीश जाधव यांची फिर्याद

नगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील कचरा संकलन व वाहतुकीसाठी महापालिकेने ठेका दिलेल्या स्वयंभू ट्रान्सपोर्टचे संचालक नामदेव भापकर (रा. खडकी, पुणे) यांच्याविरूध्द येथील तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश तुकाराम जाधव (रा. बागरोजा हाडको) यांनी फिर्याद दिली आहे. महानगरपालिकेची १ कोटी ४२ लाख ६३ हजार १३८ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जाधव यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी निकाल देत स्वयंभु ट्रान्सपोर्टविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यानंतर मंगळवारी हा गुन्हा दाखल झाला आहे. भापकर यांच्या स्वयंभु ट्रान्सपोर्टने शहरातील कचरा संकलन करत असताना नोव्हेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० दरम्यान कॉन्ट्रॅक्टमध्ये देण्यात आलेल्या अटी व शर्तीची पुर्तता न करता बनावट बिले तयार केली. ती बिले महापालिकेला सादर करून १ कोटी ४२ लाख ६३ हजार १३८ रूपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी भापकर याच्याविरुध्द कलम ४२०, ४६७, ४६८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक जे. सी. मुजावर करीत आहेत.

मनपाचे ‘ते’ अधिकारीही अडचणीत या बिलासंदर्भात जाधव यांनी तक्रार केल्यानंतरही महापालिकेने काही बिले अदा केली आहे. सदर बिलांची खातरजमा न केल्यामुळे महापालिकेचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यासंदर्भात आता गुन्हा दाखल झाल्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी बिले मंजूर केली, ते अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

महापालिकेकडून दुर्लक्ष; कोर्टात दखल कचरा संकलनाची वाढीव बिले दिल्याची तक्रार जाधव यांनी केली होती. महापालिकेने कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांनी याचिका फेटाळली होती. जाधव यांनी पुन्हा फेरविचार याचिका दाखल केली होती. स्वयंभु ट्रान्सपोर्टने बिले सादर करताना दुचाकी वाहनांचे नंबर असलेल्या गाड्यांची बिले दिल्याचा दावा जाधव यांनी केला होता. त्यावर जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...