आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्गखोल्या मंजूरी प्रमाणासह १ ते ६० पटासाठी दोन शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यानुसार पटसंख्या दोन असो अथवा २० विद्यार्थी पटावर असले तरी, दोन शिक्षकांची तेथे नियुक्ती आहे. जिल्ह्यात २० पटाच्या आतील शाळांची संख्या ७५२ असून त्यावर १ हजार ४५५ शिक्षक नियुक्त आहेत. तर दुसरीकडे ४५० शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे रिक्त जागांवर कमी पटाच्या शाळेतील गुरूजी पाठवण्याचा विचार प्रशासकीय स्तरावर सुरू आहे.
जिल्ह्यात प्राथमिक शाळांची संख्या ३ हजार ५६९ असून त्यावर ११ हजार १८४ शिक्षक नियुक्त आहेत. १ ते ६० पटासाठी किमान दोन शिक्षकांची नियुक्ती केली जाते. २०२१-२०२२ ची संच मान्यता अंतिम नसल्याने २०२०-२०२१ ची संच मान्यता गृहित धरली आहे. त्यानुसार जिल्ह्यात २० पेक्षा कमी विद्यार्थी पट असलेल्या ७५२ शाळा आहेत. विशेष म्हणजे २ विद्यार्थी असलेल्या ३ तर १० विद्यार्थी असलेल्या २४ शाळा आहेत. कमी पट असलेल्या शाळांतही दोन शिक्षक आहेत. त्यामुळे जेथे गरज आहे, अशा ठिकाणी कमी पट असलेल्या शाळेतील शिक्षक पाठवण्याचा विचार प्रशासकीय स्तरावर सुरू आहे.
तरी पण दोन शिक्षक आवश्यक
आजही जिल्ह्यात दुर्गम वाड्या-वस्त्या आहेत. विद्यार्थी एक असो अथवा जास्त प्रत्येकालाच शिक्षण मिळाले पाहिजे. पाच पटाच्या आतील दोन शिक्षकी शाळांची भौगोलिक स्थिती व गरज पाहूनच तेथून जास्त पटाच्या शाळेत एक शिक्षक वर्ग करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा. परंतु, कमी पटाच्या कारणास्तव एकच शिक्षक ठेवला तर तो शिक्षक रजेवर अथाव इतर कारणास्तव शाळेत येऊ शकला नाही, तर शाळाच त्या कालावधीत बंद राहू शकते. त्यामुळे दोन शिक्षक आवश्यकच आहेत.
तात्पुरत्या स्वरुपात असे करता येईल
जास्त पटाच्या ज्या शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत, त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात जवळच असलेल्या कमी पटाच्या शाळांतील शिक्षकांना पाठवता येईल. परंतु, ही व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात असू शकेल.'' भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, प्राथमिक.
झेडपीला प्रतिनियुक्तीचे अधिकार नाही
शिक्षकांच्या रिक्त असलेल्या शाळेवर कमी पटावरील शाळेतील शिक्षकांना काम करण्याचे तोंडी आदेश दिले जातात. परंतु, लेखी आदेश जिल्हा परिषदेला काढता येणार नाहीत. त्यासाठी शासनाला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे प्रशासन याबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे.
शुन्य पटाच्या शाळा बंद
मागील काही वर्षांत ० पटसंख्या असलेल्या तसेच गैरसोयीच्या ठिकाणच्या २४ शाळा बंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाकडून समजली. परंतु, सध्या तरी कोणतीही शाळा बंद करण्याचे निर्देश नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.