आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेह राईड:नगरच्या 63 वर्षीय 2 सायकलिस्टनी पूर्ण केली 527 किमीची मनाली ते लेह राईड

अिनल हिवाळे |नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दररोज बदलत जाणारे वातावरण, ऑक्सिजनची कमी जास्त होणारी पातळी, चढ उताराचे रस्ते, गर्द झाडी, उघडे डोंगर, वाहणारे झरे, नदीचा उगम अशी निसर्गाची रूपे पाहत मनाली ते लेह हे सुमारे ५२७ किलोमीटरचे अंतर अवघ्या नऊ दिवसांत पूर्ण केल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे, महेश कोठडीया यांनी दिली. या दोघांचे वय ६३ वर्षे आहे, या वयात त्यांनी आव्हानात्मक अशी ही खडतर सायकल राईड पूर्ण केली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त नाशिक येथील रॉयल रायडर्स ग्रुपतर्फे १८ ते २७ जुलै कालावधीत मनाली ते लेह या सायकल रॅलीचे आयोजन केले होते. यात ७० पुरुष, ५ महिला अशा ७५ रायडर्सचा समावेश होता. यात नगरमधून अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर मुळे, महेश कोठडीया हे ६३ वर्षीय दोघे जण सहभागी झाले होते.

मनाली येथून सुरू झालेली सायकलवारी रोहतांग पास, सिसू जिस्पा, झिंग झिंग बार, बारालाचा पास, नकिला पास, लाचुलनग पास, पांग, डेबरिंग, टांगलांग पास, लेह, खारदुंगला पास असे रस्ते पार करत हिमाचल प्रदेशमधून जम्मू-काश्मीरमधील लेह-लडाख अशा दोन राज्यांतून व केंद्रशासित प्रदेशातून ही सायकलयात्रा पार पडली. मनाली ते लेह हा मार्ग जगातील सर्वांत उंचीवर असलेला वाहतुकीचा व समुद्रसपाटीपासून १७ हजार ५०० फूट उंचीवर आहे. या सायकलिस्टनी २६ जुलैला सायकलवारी पूर्ण करत लेह येथे कारगिल विजय दिन साजरा केला.

दररोज ३५ किमी सायकलिंग
लॉकडाऊन काळापासून उमेश कोठडीया हे सायकलिंग कररत आहेत. ते दररोज नियमित ३५ किमी सायकलिंग करतात. आता सायकलिंगची सवय लागली आहे. दोन वर्षांत सुमारे २२ किमी सायकलिंग केली, असे त्यांनी उमेश कोठडीया यांनी सांगितले.

एक वेगळा अनुभव
घाट चढणे, कमी ऑक्सिजन, १७ हजार फूट उंचावर असलेल्या या रस्त्यावर वाहने आणि माणसांची वर्दळ कमी होती, तरी या सायकल यात्रेतून एक वेगळा अनुभव मिळाला. ही यात्रा करण्यासाठी शारिरीक तंदुरुस्ती आिण सायकलिंगचा नियमित सराव असणे गरजेचा आहे. कारण येथील वातावरण कधीही बदलू शकते.''
उमेश कोठडीया, सायकलिस्ट, नगर.

मनाली लेह म्हणजे सायकलिस्टची काशी यात्रा
ही यात्रा खडतर आणि आव्हानात्मक होती. मात्र सायकलीने प्रवास करताना निसर्गाची विविध रूपे आम्ही अनुभवली. निसर्गाच्या विविध रूपांतून आम्हाला देवाची रूपे दिसत होती. मनाली लेह ही सायकल यात्रा म्हणजे सायकल्स साठी काशी यात्राच आहे.'' चंद्रशेखर मुळे, अध्यक्ष अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशन, नगर.

बातम्या आणखी आहेत...