आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर जिल्ह्यामध्ये 10 डिसेंबर 2020 ते 6 एप्रिल 2021 या चार महिन्यांत विविध कारणांमुळे 123 शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला होता, तर एका शेतकऱ्याला अपंगत्व आले होते. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत एकूण 124 प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर करण्यात आले होते. योजनेसाठी कोणतीही विमा कंपनी नियुक्त नसताना खंडित कालावधीतील 124 पैकी 113 प्रकरणे मंजूर करून कृषी आयुक्तालयाकडून 2 कोटी 26 लाखांचे अनुदान वर्ग करण्यात आले. उर्वरित 11 प्रस्ताव प्रलंबित आहेत.
किती मिळते अनुदान?
शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्याचे कुटुंब उद्धवस्त होऊ नये, त्यांना जीवन जगण्याचे पाठबळ मिळावे, यासाठी राज्याच्या कृषी विभागाच्यावतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अर्थसहाय्य करण्यात येते. अपघातामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाखांचे अनुदान, तर 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व आल्यास संबंधित शेतकऱ्याला निकषाप्रमाणे दोन लाख रुपये अथवा एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते.
113 प्रस्ताव मंजूर
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी दरवर्षी कृषी विभाग खासगी विमा कंपन्या नियुक्त करीत असते. यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा जीवन विमा राज्य शासनाचा कृषी विभाग मोफत उतरवत असते. परंतु 10 डिसेंबर 2020 ते 6 एप्रिल 2021 या कालावधीत राज्य शासनाने या योजनेसाठी कोणत्याही विमा कंपनीची नियुक्ती केली नव्हती. तरीही या खंडित कालावधीतील शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व आल्याने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांचा कृषी विभागाने स्वतः निपटारा केला. अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 124 पैकी 113 प्रस्ताव मंजूर करून अनुदान उपलब्ध करुन दिले. तर उर्वरित अनुदानाचे वाटप बाकी असलेले 11 प्रस्ताव प्रलंबित आहेत.
यांना मिळाल लाभ
पारनेर व संगमनेर तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांचा मृत्यू चार महिन्यांत पारनेर व संगमनेर तालुक्यात प्रत्येकी 15 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. नेवासे 13, नगर व पाथर्डी प्रत्येकी 11, अकोले 10, राहुरी 9, जामखेड 8, शेवगाव 7, श्रीगोंदे, कोपरगाव व राहाता प्रत्येकी 6, कर्जत 4, श्रीरामपूरमध्ये 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. नेवासे तालुक्यात एका शेतकऱ्याला अपघातामुळे अपंगत्व आले, ही सर्व प्रकरणे कृषी आयुक्त कार्यालयाकडे प्राप्त झाली होती, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली. प्रस्ताव दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे शेतकरी म्हणून 7/12, 6 क, 6 ड यामध्ये नोंदणीकृत 10 ते 75 वयोगटातील सर्व शेतकरी, तालुका कृषी अधिकारी पत्र, दावा अर्ज, शेतकऱ्यांच्या वारसदाराचे बँकेचे पासबुक झेरॉक्स, वयाचा दाखला झेरॉक्स, मृत्यू प्रमाणपत्र, एफआयआर अकस्मात मृत्यूची खबर, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, व्हिसेरा रिपोर्ट आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.