आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासन दक्ष:अहमदनगर जिल्ह्यात पुराचा धोका; नदीकाठच्या 223 गावांना नोटीस बजावण्याचा निर्णय

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यात 223 गावे हे पूर प्रवण म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. नदीकाठच्या पूर प्रवण गावांना दक्षतेसाठी नोटीस बजावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संभाव्य मान्सून स्थिती व संभाव्य पूरग्रस्त गावांचा, तसेच केलेल्या उपाययोजनांचा अहवाल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ऑनलाइन सादर करण्यात आला आहे.

मान्सून पूर्वतयारी आढावा बैठका तालुकानिहाय घेतल्या जाणार असून, अहमदनगर जिल्ह्यातील गोदावरी, मुळा, प्रवरा, भीमा, घोड, सीना, खैरी, म्हाळुंगी या नदी काठच्या 223 गावांना संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन ती गावे पूरप्रवण म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. या गावांना दक्षतेसाठी तालुका स्तरावरून नोटीस बजावण्यात येणार आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नैसर्गिक आपत्ती, पूर प्रतिबंधात्मक आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी 31 मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील संभाव्य मान्सून स्थिती व संभाव्य पूरग्रस्त गावांचा, तसेच केलेल्या उपाययोजनांचा अहवाल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ऑनलाइन सादर करण्यात आला आहे.

प्रशासनाकडे 7 बोट उपलब्ध

अहमदनगर जिल्ह्यात 2020 मध्ये सरासरी 767 मिलिमीटर पाऊस आला होता. तर 2021 मध्ये सरासरी 566 मिलिमीटर पाऊस झाला होता. मान्सूनच्या पावसामुळे नद्यांना पूर आल्यानंतर दुर्घटना घडल्यास तातडीने उपाययोजना म्हणून प्रशासनाकडे शोध व बचाव कार्यासाठी 7 बोट आहेत. यात 5 रबर बोट व 2 फायबर बोट उपलब्ध आहेत.

बातम्या आणखी आहेत...