आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत संपूर्ण सौरऊर्जेवर चालणारी २२.७५ कोटी खर्चून निर्माण करावयाच्या नियोजित ब्राह्मणवाडा, खुंटेवाडी, कळंब व मन्याळे गावांच्या संयुक्त नळपाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली आहे. योजनेच्या कामाला गती मिळावी म्हणून बुधवारी (११ मे ) ग्रामसभा आयोजित केली आहे. एकाच वर्षात ही योजना पूर्ण करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळ व पाणी टंचाईशी दोन हात करणाऱ्या ब्राह्मणवाडा गाव व परिसराला कोतूळ जवळील मुळा नदीवर अस्तित्वात आलेल्या पिंपळगावखांड लघू पाटबंधारे प्रकल्पातून पिण्याचे पाणी मिळावे म्हणून ब्राह्मणवाडा ग्रामस्थांकडून सातत्याने मागणी जोर धरत होती. या मागणीचा पाठपुरावा करण्यात आल्याने केंद्र व राज्य शासनाच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ब्राह्मणवाडा, खुंटेवाडी, कळंब व मन्याळे या गावांना एकत्रित २२ कोटी ७६ लाख ५२ हजार रुपयांच्या नळपाणीपुरवठा योजनेस २ मे २०२२ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. या योजनेत महावितरणकडून विजेची गरज ओळखून व ते वीजबिल भरण्याची ग्रामस्थांची असमर्थता लक्षात घेऊन ही संपूर्ण योजना सौरऊर्जेवर राबवण्यात येणार आहे. यामुळे ब्राह्मणवाडा पंचक्रोशीतील नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.
शिवकाळापासून ब्राह्मणवाडा गाव जवळपास चौदा वाड्यात विस्तारलेले आहे. यासह शेजारील दोन-तीन गावांच्या परिसरातून पिण्याच्या पाण्याच्या दुर्भिक्ष्य सतत जाणवतेय. हा भाग शाश्वत पिण्याच्या पाणी योजनेपासून वंचितच आहे. सद्यस्थितीत शेजारील बेलापूर येथील लघू पाटबंधारे प्रकल्पात घेतलेल्या कुपनलिकांमधून परिसरात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण हे कूपनलिकांचे पाणी खात्रीलायक भरवशाचे नाही. दरवर्षी उन्हाळ्यात बेलापूर लघू प्रकल्प एप्रिलपासून कोरडाठाक पडतो. परिणामी अपुऱ्या पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त होतात. येथे अस्तित्वातील ऐतिहासिक अहिल्याबाई बारव, आनंददरा व बेलापूर पाझर तलाव यातून शासनाकडून चार नळपाणी पुरवठा योजना राबवण्यात आल्या. मात्र उन्हाळ्यात पाणी टंचाईने होणारी होरपळ काही थांबली नव्हती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.