आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळा धरण 96.40% भरले:धरणात 25 हजार 71 दशलक्ष घनफूट पाणीसाठा; नदीपात्रात 8 हजार क्युसेकने विसर्ग

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुळा धरण 96.40 टक्के भरले असून 25 हजार 71 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. - Divya Marathi
मुळा धरण 96.40 टक्के भरले असून 25 हजार 71 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळख असलेले राहुरीचे मुळा धरण 96.40 टक्के भरले आहे. सध्या धरणात 25 हजार 71 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे मुळा धरणातून मुळा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग मंगळवारी दुपारपासून वाढवण्यात आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणाची पाणी पातळी समान ठेवण्यासाठी टप्प्याटप्याने नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. दरम्याान, शेती सिंचनाच्या पाण्याची आता चिंता मिटली असून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

मंगळवारी (16 ऑगस्ट) सायंकाळी 6 वाजता मुळा धरणाच्या 11 मोऱ्यातून मुळा नदी पात्रात 8 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. 26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाचा मंगळवारी सायंकाळी 6 वाजता 25 हजार 71 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्याने धरण 96.40 टक्के भरले आहे. मुळा धरणाची पाणी पातळी 1810.45 फूटापर्यंत जावून पोहोचली आहे.

सायंकाळी कोतूळकडून मुळा धरणात 8 हजार 28 क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. 14 ते 16 ऑगष्ट या कालावधीत मुळा धरणातून मुळा नदीपात्रात 780 दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग झाला आहे. रंगीबेरंगी रोशनाईने सजवलेल्या मुळा धरणाच्या 11 मोऱ्या अर्धा फूट उंचावून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने हा अनोखा नजराना पाहण्यासाठी मुळा धरणावर पर्यटकांची संख्या वाढत आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात दररोज वाढ होत आहे. पाणीसाठ्यात वाढ होत असल्यामुळे मुळा धरणाच्या मोरया तून मुळा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिला तर मुळा धरण दोन दिवसातच तांत्रिकदृष्ट्या भरणार आहे. दरम्यान मुळा धरण भरल्यामुळे जिल्ह्यातील शेती सिंचनाचा प्रश्न मिटला असून रब्बी पिकांच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...