आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:वृध्द दाम्पत्याचा खून करून चोरी करणारे 3 सराईत आरोपी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव तालुका पोलिसांची कारवाई

नगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथेल वृध्द दाम्पत्याचा खून करुन जबरी चोरी करणारे तीन सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहेत. ३० मे ते १ जून दरम्यान अज्ञात आरोपींनी रात्रीच्या वेळी राधाबाई दत्तात्रय भुजाडे (वय ६५) व वडील दत्तात्रय गंगाधर भुजाडे (वय ७५) या दोघांचा खून करुन १ लाख ९० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. याबाबत जालिंदर दत्तात्रय भुजाडे (वय ४०, रा. आपेगाव, ता. कोपरगाव हल्ली, रा. संतोषनगर (बाकी), ता. खेड, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगांव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर व जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना कारवाईचे आदेश दिले होते. कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी व अंमलदारांची तीन विशेष पथके तपासासाठी नियुक्त केली होती. सदर गुन्हा हा अजय काळे (रा.पढेगांव, ता. कोपरगांव) याने त्याच्या साथीदारासह केल्याची माहिती मिळताच पोलिस पथक तात्काळ पढेगांव येथे जाऊन आरोपी अजय काळे याला पळून जाताना पाठलाग करुन ताब्यात घेतले. सदर गुन्हा हा त्याचा साथीदार अमित कागद चव्हाण (वय २०,रा. हिंगणी, हल्ली रा. पढेगांव, ता.कोपरगांव) जंतेश छंदु काळे (वय २२ रा. पढेगाव, ता. कोपरगाव) यांनी मिळून केल्याची माहिती त्याने दिली. त्यानुसार आरोपी अमित चव्हाण व जंतेश काळे यांनाही ताब्यात घेतले आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर व शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई सोपान गोरे, सफौ बाळासाहेब मुळीक, मोहन गाजरे, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, सुनिल चव्हाण, पोना शंकर चौधरी, विशाल दळवी, राहुल सोळुंके, सचिन आडबल, संदीप चव्हाण, दिपक शिंदे, पोकॉ सागर ससाणे, रोहित येमुल, रणजीत जाधव, चापोहेकॉ बबन बेरड, चंद्रकांत कुसळकर,अर्जुन बडे व चापोना भरत बुधवंत आणि कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोनि दौलतराव जाधव, सपोनि सुरेश आव्हाड, पोहेकॉ ईरफान शेख आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पुढील तपास कोपरगाव तालुका पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...