आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा७४ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एसटी बससेवेत पहिल्या गाडीवर वाहक असणारे नगरमधील लक्ष्मण केवटे (वय ९९) यांनी बुधवारी सकाळी साडे दहा वाजता तारकपूर आगारात ‘शिवाई’ या पहिल्या इलेक्ट्रीक बसला हिरवा झेंडा दाखवला व बस पुण्याकडे रवाना झाली. पहिल्याच बसमधून नगरचे ३२ प्रवासी पुण्याकडे मार्गस्थ झाले. तर दुपारी पुण्याहून नगरकडे आलेल्या बसमध्ये २० प्रवासी होते. दरम्यान, बससमवेत फोटो घेण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांसह प्रवाशांनी गर्दी केली होती.
वाढता डिझेल खर्च तसेच नव्या युगाची गरज ओळखून एसटीच्या प्रवासी सेवेत नव्याने ई-बस दाखल झाल्या आहेत. १ जून १९४८ रोजी एसटीची प्रवासी बससेवा सुरू झाली. या घटनेस ७४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बुधवारी १ जूनला एकाचवेळी नगरहून पुण्याच्या दिशेने व पुण्याहून नगरच्या दिशेने अशा दोन ई-बस सोडण्यात आल्या.
नगरची बस तारकपूर बसस्थानकातून रवाना झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महापौर रोहिणी शेंडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, मनपा आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, एसटीचे नगरचे विभाग नियंत्रक विजय गिते, तारकपूर आगाराचे व्यवस्थापक अभिजीत आघाव, प्रवासी संघटनेचे रणजित श्रीगोड, रामेश्वर मिनियार, शब्बीर शेख, गजेंद्र क्षीरसागर, गोरख बारहाते, संघटक दत्तात्रय सोनार, हनिफ शेख, सुरेश क्षीरसागर आदींसह एसटी अधिकारी, चालक-वाहक उपस्थित होते.
पहिल्या ई-बस शिवाईसह जुन्या लालपरी बसवरही फुलांच्या माळा व फुगे लावून सजवण्यात आल्या होत्या. एसटी बससेवेला ७४ वर्षे पूर्ण होऊन अमृत महोत्सवी ७५ व्या वर्षात पदार्पण केले. जुन्या व नव्या बसची सजावट करण्यात आली होती. दोन्ही बसभोवती आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती. एसटी हे सर्वसामान्यांच्या दळणवळणाचे साधन असल्याने सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेत पहिली ई-बस रुजू होत असल्याचा विशेष आनंद वाटतो, अशी भावना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी व्यक्त केली. पहिले वाहक केवटे म्हणाले, एसटीच्या प्रवासी सेवेला ७४ वर्षे होत आहेत व माझ्या वयाला ९९ वर्षे झाली आहेत. १ जून १९४८ ला पहिली बस घेऊन पुण्याला रवाना होतानाचा क्षण आजही आठवतो, असे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.