आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरमधून 350 टन आंब्याची निर्यात:जिल्ह्यात 6 हजार 758 हेक्‍टरवर आंब्याच्या बागा, 106 शेतकऱ्यांकडून निर्यातीसाठी नोंदणी

अहमदनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यातून चालू हंगामात सुमारे 350 टन आंब्याची विविध देशांत निर्यात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 106 शेतकऱ्यांनी अपेडा अंतर्गत 2021- 22 या वर्षात मॅंगोनेटद्वारे 102 हेक्टरवरील आंबा निर्यातीसाठी कृषी विभागाकडे नोंदणी केली होती. या अंतर्गत आंब्याची निर्यात करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध फळबागांचे एकूण 76 हजार 172 हेक्‍टर क्षेत्र आहे. यामध्ये आंबा पिकाखालील 6 हजार 758 हेक्‍टर क्षेत्र आहे. विविध फळांच्या व भाजीपाल्याच्या निर्यातीसाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून अपेडा अंतर्गत नोंदणी करावी लागते. यामध्ये मॅंगोनेटद्वारे सन 2021- 22 मध्ये 106 शेतकऱ्यांनी 102.5 हेक्‍टर क्षेत्रावरील आंब्याची निर्यातीसाठी नोंद केली होती. अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध फळांच्या निर्यातीसाठी पाथर्डी तालुक्यातील के. बी. एक्सपोर्ट ही एकमेव पॅक हाऊस कंपनी आहे. अहमदनगर जिल्ह्यातून दर्जेदार 350 टन आंब्याची जपान व युरोपियन देशांमध्ये निर्यात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी निर्यातक्षम फळांची निर्यात करून त्यांना आपल्या फळपिकांतून चांगले उत्पन्न मिळावे, यासाठी कृषी विभागाच्या वतीने निर्यातक्षम फळे व भाजीपाला बागांची हॉर्टीनेट ट्रेसिबिलिटी नेटद्वारे नोंदणी करण्यात येते. यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही करण्यात येते. त्यामुळे जिल्ह्यातून आंबा निर्यातीला वाव मिळाला आहे.

शेतकऱ्यांनी फळ, भाज्यांची निर्यात करावी

अहमदनगर जिल्ह्यात फळबागांचे मोठे क्षेत्र आहे. द्राक्ष, डाळिंब आणि आंबा या फळांची नगर जिल्ह्यातून निर्यात होत असते. यावर्षी जिल्ह्यातून 350 टन आंबा निर्यात करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या वतीने फळांच्या निर्यातीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. यासाठी फळबागधारक शेतकऱ्यांनी अपेडा अंतर्गत नोंदणी करावी, असे आवाहन कृषी उपसंचालक रवींद्र माने यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...