आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • 44 Corporators Think Budget Is Meaningless; Waiting For The Quorum To Be Met, The Speaker Presented A Budget Of Rs 817 Crore To The General Assembly | Marathi News

सभेकडे पाठ:44 नगरसेवकांना अर्थसंकल्प वाटतोय निरर्थक; कोरम पूर्ण होण्यासाठी करावी लागली प्रतीक्षा, सभापतींनी महासभेत सादर केले 817 कोटींचे बजेट

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नगरसेवकांच्या उपस्थितीकडे लक्ष

अंदाजपत्रकाचा महत्त्वाचा विषय असूनही ७३ पैकी तब्बल ४४ नगरसेवकांनी अंदाजपत्रकीय सभेकडे पाठ फिरवल्यामुळे नगर शहराच्या विकासाप्रती असलेली नगरसेवकांची अनास्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. सभेसाठी २३ सदस्यांच्या उपस्थितीचा कोरम पूर्ण न झाल्यामुळे उशिराने सभा सुरू करावी लागली. दरम्यान, स्थायी समितीने सुचवलेल्या १५ कोटींच्या वाढीव तरतुदींसह सभापती कुमारसिंह वाकळे यांनी ८१७ कोटींचे अंदाजपत्रक महासभेत सादर केले.

महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी अंदाजपत्रकीय महासभेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी एक वाजता सभा आयोजित असतानाही अनेक नगरसेवक उशिराने उपस्थित झाले. सभेसाठी २३ सदस्यांचा कोरम पूर्ण होणे आवश्यक होते. त्यामुळे सुमारे १५ ते २० मिनिटे सभा उशिराने सुरू करावी लागली. त्यातही ७३ नगरसेवकांपैकी केवळ २९ नगरसेवकांनीच सभेला हजेरी लावली. तब्बल ४४ नगरसेवकांनी अंदाजपत्रकीय सभेकडे पाठ फिरवल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरातील विकासकामे व समस्यांच्या विषयांवर चर्चा होऊन अंदाजपत्रकात तरतुदी प्रस्तावित केल्या जातात. अशा महत्त्वाच्या सभेकडे निम्म्याहून अधिक नगरसेवकांनी पाठ फिरवल्यामुळे अंदाजपत्रकाविषयी व शहराच्या विकासाविषयी त्यांची उदासीनता चर्चेचा विषय ठरली आहे.

महापालिका प्रशासनाने आगामी आर्थिक वर्षातील जमाखर्चाच्या तरतुदी करून ८०२ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले होते. स्थायी समितीमध्ये यावर चर्चा होऊन विविध शिफारसी करण्यात आल्या आहेत. या शिफारसीनुसार जमा बाजूत सुमारे १३ कोटी, तर खर्चाच्या बाजूत सुमारे १५ कोटींची वाढ करत ८१७ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समिती कडून महासभेत सादर करण्यात आले आहे. महापौर शेंडगे यांनी अंदाजपत्रकावर अभ्यास करण्यासाठी नगरसेवकांना एक दिवसाची वेळ देत सभा तहकूब केली. मंगळवारी महासभेत अंदाजपत्रकावर चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, नगरसेवकांना अंदाजपत्रकाच्या प्रती साध्या कागदी पिशवीमध्ये देण्यात आल्या. यावरून माजी उपमहापौर मालन ढोणे यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावले. अंदाजपत्रक वर्षभर जतन केले जाते. ते एखाद्या चांगल्या बॅगमध्ये देणे अपेक्षित होते. ८१७ कोटींच्या अंदाजपत्रकासाठी केवळ ५ रुपयांची पिशवी वापरली गेली, यावरून ढोणे यांनी नाराजी व्यक्त केली.

स्थायी समितीकडून अंदाजपत्रकात १५ कोटी रुपयांची वाढ, अंदाजपत्रकावर आजपासून होणार चर्चा

अंदाजपत्रक सादर करण्यास विलंब का?
मनपा प्रशासनाकडून काही वर्षांपासून उशिराने अंदाजपत्रक सादर केले जात आहे. २० फेब्रुवारी पूर्वीच अंदाजपत्रकीय सभा होणे अपेक्षित आहे. जेणेकरून नागरिकांच्या मागण्या व वाढीव सुविधा यासाठी किती कर व दर वाढवावे लागतील, याचे नियोजन करता येते. वेळेत अंदाजपत्रक आले नाही, तर कर-दरवाढ कशा करणार? यात वाढ झाली नाही, तर सुविधा कशा देणार, असा सवाल करत माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी प्रशासनाला जाब विचारला. महासभा करवाढ करत नसल्यामुळे आर्थिक नियोजन बिघडते व सुविधा देता येत नाही, असे प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र, प्रशासनच वेळेत अंदाजपत्रक देत नाही. तरतुदी विभागांकडून वेळेत सादर केल्या जात नसतील, तर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करा, अशी मागणी त्यांनी केली.

सभापती वाकळेंनी मांडल्या प्रस्तावित योजना
सावेडी येथील महापालिकेच्या जागेत व्यापारी संकुल, महापालिकेच्या रक्तपेढीमधून मोफत रक्त पिशव्या, सावेडी येथील प्रभात बेकरीच्या मागील जागेत महापालिकेचे अद्ययावत हॉस्पिटल, शहरात वृक्षारोपण, पिंपळगाव माळवी येथील ७०० एकर जागेमध्ये पर्यटनाच्यादृष्टीने विकास आराखडा तयार करणे, शहरात चौक सुशोभीकरण, दुसऱ्या टप्प्यातील भुयारी गटार योजना, गंगा उद्यानजवळ म्युझिकल फाऊंटन, सारसनगरमध्ये स्पोर्ट कॉम्प्लेक्स आदी विविध योजना येत्या वर्षात मार्गी लावण्याचा मानस सभापती कुमारसिंह वाकळे यांनी महासभेत अंदाजपत्रक सादर केल्यानंतर व्यक्त केला.

पहिल्याच ऑफलाइन सभेत महापौरांचा अपमान!
महापौरपदी विराजमान झाल्यानंतर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच ऑफलाइन सभा पार पडली. मात्र, या सभेत महापौरांसमोर राजदंड नसल्यामुळे नगरसेवक अनिल शिंदे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. हा महापौरांचा अपमान असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर नगरसचिव कार्यालयातील “भालदार-चोपदार’चे पद रिक्त आहे. या पदावर इतर कर्मचारी काम करण्यास तयार नसल्याचे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले. त्यावर आक्षेप घेत विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी प्रशासनाला जाब विचारला. नगररचना विभागात जबाबदारी सोपवली तर कसे सगळे पळतात? असा सवाल करत त्यांनी कर्मचाऱ्यांचे कान टोचले. अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांनी याची माहिती घेऊन उद्या सभागृहात सादर करू, असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...