आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर शहर:कारंजांचे वैभव पुन्हा फुलवण्यासाठी गरज 50 लाखांच्या संजीवनीची..!

नगर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कारंजा दुरुस्तीसाठी अवघी 20 लाखांची तरतुद, स्थायी समितीच्या चर्चेकडे लक्ष

नगरपालिका अस्तित्वात असताना उद्यान विभागाकडे तब्बल १८० कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध होते. त्यावेळी नगर शहरातील विविध उद्यांने एकेकाळी कारंजे अन् हिरवाईने बहरलेली होती. मनपा अस्तीत्वात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने उद्यान विभागातील मनुष्यबळ कमी करण्यात आले. त्यामुळे ही उद्याने खासगी ठेकेदारांच्या घशात घालण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे. पुन्हा एकदा कारंजांचे शहर पाहण्यासाठी किमान ५० लाखांच्या निधीची गरज आहे.

नगर शहरात एकूण ५८ उद्याने असून नव्याने अमृतमधील २८ उद्यानांसह एकुण ८० उद्याने आहेत. यापैकी गंगा, सिद्धीबाग, लक्ष्मी उद्यानात कारंजे आहेत. तसेच शहरातील माणिक चौक, पंडित नेहरू पुतळा धबधबा, चौपाटी कारंजा आदी १५ ठिकाणी कारंजे आहेत. परंतु, मनपाच्या दुर्लक्षामुळे शहरातील कारंजे सद्यस्थितीत बंद अवस्थेत आहेत. मनपा प्रशासनाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे शहरातील उद्यानांचे माळरानात रूपांतर होत आहे. रिकाम्या भुखंडात विकसीत केलेल्या अनेक उद्यानांमध्ये गवत वाढले असून स्वच्छताही वेळेवर केली जात नाही. याबाबत उद्यान विभागाने अपुरे कुशल मनुष्यबळ नसल्याचे कारण दाखवून देखभालीबाबत हतबलता दर्शवली आहे. त्यामुळे उद्यानांच्या खासगीकरणावर मागील काही वर्षांत भर दिला जात आहे. जर मनपाला पुन्हा सर्व कारंजे दुरूस्त करून त्यांचे नुतनीकरण करायचे असेल तर किमान एक कोटींच्या निधीची आवश्यकता आहे, असे प्रशासनाकडून समजले. त्यामुळे उद्यान विभागासाठी तरतुदीत वाढ करण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार सोमवारी (१४ मार्च) स्थायी समितीत अंदाजपत्रकावर चर्चा होत असल्याने, या चर्चेत उद्यानांबाबत काय निर्णय होईल, याकडेही लक्ष लागले आहे.

शहरात १५ कारंजे, मनपाच्या दुर्लक्षामुळे कारंजांची झाली अवस्था बिकट

उद्यान विभागासाठी हवेत ८० कर्मचारी
शहरातील उद्यानांची देखभाल व दुरूस्ती करण्याची आवश्यकता आहे. हे सर्व कारंजे पुन्हा सुरू करण्यासाठी किमान ५० लाखांच्या निधीची आवश्यकता आहे. सर्व उद्यानांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी ८० कर्मचारी व मुबलक निधी देऊन उद्यान विभागाच्या बळकटी करणाची आवश्यक आहे. सद्यस्थितीत अवघे ३४ कर्मचारी उरले आहे.'' शशिकांत नजान, उद्यान विभागप्रमुख.

भुषण देशमुख, , इतिहास अभ्यासक, नगर.
दिव्य मराठी एक्सपर्ट व्ह्यू

कारंजाचा देशात पहिला प्रयोग नगर शहरात
बारा तोटी कारंजा, १६ तोटी कारंजा होता, ते आता नामशेष झाले. त्यानंतर फराह बक्ष महाल, शहा शरिफ दर्गा आदी ठिकाणीही कारंजाचे अवशेष आहेत. कोणतीही वीज नसताना देशातील पहिला कारंजा प्रयोगच त्याकाळी नगरमध्ये झाला होता. त्याचे पुरावेही आहेत, पण देखभाल दुरूस्ती नसल्याने त्यांचे फक्त अवशेष उरले. मनपाने देखभाल करून शहराला पुन्हा कारंजांचे वैभव प्राप्त करून देण्याची गरज आहे.

शहरातील कारंजे कोठे ?
कै. देशपाडे उद्यान शंकर कारंजा, महालक्ष्मी उद्यान २, नेहरू पुतळा धबधबा, सिद्धीबाग पक्षी कारंजा, अप्पु कारंजा, प्रोफेसर कारंजा, सावरकर कारंजा, रावसाहेब पटवर्धन कारंजा, ख्रिस्तगल्ली कारंजा, भापकरबाई कारंजा, आनंदऋषीजी कारंजा, स्वामी विवेकानंद पुतळा कारंजा, यशवंतराव चव्हाण, महात्मा फुले पुतळा कारंजा (केडगाव), साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक कारंजा.

१९६१ चे मत्सालय दुर्लक्षित
अच्युतराव पटवर्धन यांच्या हस्ते सिद्धीबागेत जून १९६१ मत्सालयाचे उद्घाटन केले. पण सत्ताधाऱ्यांची उदासिनता व प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हे उद्यान मद्यपी अन् नशेबाजांचा अड्डा बनले. आता सिद्धीबाग उद्यान चालवण्यासाठी ओम डिजीटल संस्थेने पुढाकार घेतला आहे. सोमवारी अनामत भरून उद्यान ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू होईल.

बातम्या आणखी आहेत...