आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील कचरा संकलन व वाहतुकीच्या कामासाठी कर्नाटकातील बेंगलोर व गुजरातमधील अहमदाबाद येथील कंपन्यांनी दाखल केलेल्या निविदांची दरपत्रके उघडण्यात आली आहेत. यात दोन्ही कंपन्यांनी सध्याच्या (स्वयंभू ट्रान्सपोर्ट) दरापेक्षा प्रतिटन ८०० ते १ हजार रुपयांनी म्हणजेच ५० टक्क्यांपेक्षा अधिक दर प्रस्तावित केला आहे. या निविदा मंजूर केल्यास या कामासाठी सध्याच्या खर्चापेक्षा सुमारे ४ कोटी रुपये जादा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.
महापालिकेकडे पुण्यातील बीव्हीजी इंडिया लिमिटेड, बेंगलोर येथील पी. गोपीनाथ रेड्डी व अहमदाबाद येथील श्री जी एजन्सी या तीन कंपन्यांच्या निविदा दाखल झाल्या होत्या. या निविदांपैकी पुण्याच्या बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीची निविदा तांत्रिक छाननी दरम्यान बाद करण्यात आली आहे. उर्वरित दोन कंपन्यांच्या निविदा उघडण्यात आल्या आहेत. यात पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीने प्रती टन २७०० रुपये व श्री जी एजन्सी या कंपनीने प्रती टन २ हजार ५५० रुपये दर प्रस्तावित केला आहे.
शहरात सध्या स्वयंभू ट्रान्सपोर्ट या संस्थेद्वारे काम सुरू आहे. त्यांना प्रती टन १ हजार ७१७ रुपये दर मंजूर आहे. शहरात दररोज सुमारे १३० ते १४० टन कचरा संकलन होत असल्याने मनपा दरवर्षी या कामासाठी ८ ते ९ कोटी रुपये खर्च करत आहे. नव्याने दाखल निविदांमधील सर्वात कमी दर असलेली श्री जी एजन्सी कंपनीची प्रती टन २ हजार ५५० रुपये दराची निविदा मंजूर केल्यास महापालिकेला दरवर्षी सुमारे १३ कोटींपर्यंत खर्च करावा लागणार आहे.
सध्याच्या खर्चापेक्षा हा खर्च ४ कोटींनी अधिक आहे. दरम्यान, मनपाने निविदा प्रसिद्ध करताना दरवर्षी सुमारे १० कोटी रुपये खर्च प्रस्तावित केला होता. नवीन निविदा मंजूर केल्यास आणखी ३ कोटी रुपये जादा खर्च महापालिकेला प्रस्तावित करावा लागणार आहे. त्यामुळे याबाबत महापालिका प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.