आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

67 दिवसात मिळते 50 हजारांचे उत्पन्न:राजस्थानच्या मटकी वाणाची संगमनेरात यशस्वी लागवड, कृषी अधिकारी गोसावींची माहिती

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारने स्वामी केशवानंद विद्यापीठातून विकसित केलेल्या मटकी बियाणांची यशस्वी लागवड संगमनेर तालुक्यातील भोजदरी, बोटा, देवकौठे व इतर काही भागात लागवड केली आहे. केवळ 67 दिवसांत एकरी 40 ते 50 हजार उत्पन्न देणारे हे पीक असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी दिली.

तालुका कृषी अधिकारी गाेसावी म्हणाले, राजस्थानपेक्षाही येथे या मटकीचे एकरी जास्त उत्पन्न मिळणार आहे. येथील पाण्याची परिस्थिती चांगली असल्याने या पिकाला अनुकूल वातावरण आहे. एकरी ७ ते ८ हजार रुपये या पिकासाठी खर्च येतो. आपल्याकडील पारंपरिक मटकी बियाणे (इरवड) पसरट वाढतात. या बियाणांची वाढ सरळ होते व याच्या शेंगा लांब असतात. त्यामुळे जास्त उत्पन्न मिळते.

सोयाबीनची लागवड

पाल्याचा उपयोग जनावरांचा चारा म्हणून उपयोग होतो. शेताला या पाल्यापासून चांगले खतही तयार होते. स्थानिक हॉटेलमध्ये मिसळसाठी या मटकीला मोठी मागणी आहे. या मटकीचे मार्केटिंगही कृषी विभागामार्फत केले जाणार आहे. यंदा मागील वर्षाच्या तुलनेत सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

तालुक्यात 99 टक्के पाऊस

23 हजार 855 हेक्टर क्षेत्रावर ही लागवड झाली आहे. मागील वर्षी 15 हजार 439 हेक्टरवर सोयाबीन लागवड होती. बाजरी 14 हजार 842 हेक्टरवर आहे. ती कणसावर आली आहे. पावसाने उघडीप दिल्याने चिंता होती. मात्र, बुधवारी झालेल्या पावसाने सर्वत्र चांगली परिस्थिती झाली आहे. संगमनेर तालुक्याच्या सर्वच भागात बुधवारी 58.9 मिलीमीटर पाऊस झाला. तालुक्यात जून महिन्यापासून 347.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे. एकूणच संपूर्ण तालुक्यात 99 टक्के पाऊस झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

फुल शेतीचाही यशस्वी प्रयोग

संगमनेर तालुक्यात फुल शेतीचाही यशस्वी प्रयोग शेतकरी करत आहे. शेवंती, झेंडू, निशिगंधा, गुलाब, मोगरा तसेच सोनचाफ्याची लागवड संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. कृषी विभागामार्फत सोनचाफ्याचे रोपे कोकणातून मागविण्यात आले आहे. शासनाच्या रोजगार हमी योजनेतंर्गत फुल शेतीबरोबरच केळी, द्राक्ष व ड्रॅगन फ्रुट व इतर काही फळलागवडीसाठी अनुदान दिले जाते. त्यासाठी शेतकऱ्यांना जॉब कार्ड गरजेचे आहे.

कोकणातील काळी मिरीच्या लागवडीचा संकल्प

कोकणातील काळी मिरी या मसाले पदार्थाची यशस्वी लागवड करण्याचा आमचा संकल्प असून लवकरच शेडनेटमध्ये काळी मिरीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेता येऊ शकते. काळी मिरीला बाजारात भाव जास्त असल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल. त्यासाठी लवकरच प्रायोगिक तत्वावर संगमनेर तालुक्यातील शेडनेटमध्ये काळी मिरीचे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न कृषी विभागामार्फत केला जाणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गोसावी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...