आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजी:नगर शहरासह सात तालुक्यांतील रस्त्यांवर 18 महिन्यांत धावली 56 हजार नवी वाहने; सर्वाधिक 39 हजार दुचाकींची विक्री

बंडू पवार | नगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, पारनेर, नगर ,श्रीगोंदे या सात तालुक्यांसह नगर शहरात गेल्या १८ महिन्यांत ५६ हजार ५९४ नवी वाहने रस्त्यांवर धावली, यात सर्वाधिक ३९ हजार दुचाकी वाहनांचा समावेश आहे. डिझेलच्या तुलनेत पेट्रोलवरील वाहनांनाच सर्वाधिक मागणी राहिली आहे. या वाहनांची नोंद नगरच्या उपप्रादेशिक परिवहन विभागात झाली आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून वाहन उद्योगाला ब्रेक बसला होता. वर्षभरापासून वाहन विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. नगर शहर हे ऑटोमोबाईलचे “हब’ झाले आहे. नगर शहरातील नगर - मनमाड, नगर- पुणे, नगर -औरंगाबाद या रस्त्यांवर दुचाकी व चार चाकी वाहनांची अनेक दालने आहेत. नगर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या नगर शहर व नगर, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, पारनेर, श्रीगोंदे या सात तालुक्यांत १ एप्रिल २०२१ ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधीत ५६ हजार ५९४ नवीन वाहने रस्त्यांवर धावली. यात सर्वाधिक ३९ हजार ३ दुचाकींची नोंद झाली आहे. पेट्रोलवरील ४२ हजार ८८९ तर डिझेलवरील १० हजार ३६७ वाहनांची विक्री झाली.

सीएनजी, सोलरवरील वाहनांची नोंदच नाही
पेट्रोल -डिझेल वरील वाहनांना मागणी असताना सीएनजी, सोलर वरीलवाहनांना मात्र मागणीच नाही. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे या वाहनांची नोंद झालेली नाही. नगर शहर व परिसरात सीएनजीचे तीन पेट्रोल पंप असून, दोन पेट्रोल पंप नगर- औरंगाबाद रोडवर आहेत तर एक पेट्रोल पंप नागापूर परिसरात आहे. या ठिकाणी देखील सीएनजी साठी वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात.

१ हजार ६८ इलेक्ट्रिक वाहनांची झाली नोंद
पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्याने इलेक्ट्रिकल वाहनांना मागणी वाढेल, असा अंदाज होता. अनेक दालनांनी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने विक्रीसाठी आणली आहेत. मात्र त्या वाहनांना मागणी अत्यंत कमी प्रमाणात आहे. गेल्या १८ महिन्यात १ हजार ६८ इलेक्ट्रिक वाहनांची नोंद आरटीओ विभागात झाली असून, यात दुचाकीची संख्या ९५६ आहे. तर चार चाकीची संख्या ९९ आहे.

कोरोनानंतर मोठ्या संख्येने वाहनांची नोंद
कोरोनानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे मोठ्या संख्येने नव्या वाहनांची नोंद झाली आहे. या विभागाकडे नगर शहरासह सात तालुके येतात. पेट्रोल, डिझेल बरोबरच इलेक्ट्रिक वाहनांची देखील नोंद करण्यात आली आहे. वाहनांची नोंद झाल्यानंतर संबंधितांना वाहने चालवण्यासाठी परवाने दिले जातात.'' उर्मिला पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...