आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाश्‍वत शेती:अहमदनगर जिल्ह्यात 6 हजार 820 शेतकऱ्यांनी केले माती-पाणी परीक्षण, जमिनीच्या आरोग्य तपासणीकडे शेतकर्‍यांचा कल

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस घटत आहे. जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. परिणामी उत्पादन खर्चात वाढ होऊन उत्पन्न घटत आहे. त्यामुळे शेती आतबट्ट्या ठरत आहे. त्यामुळे पिके घेताना शेतकऱ्यांनी जमिनीचे माती व पाणी परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. नगर जिल्ह्यात चालू वर्षात 6 हजार 820 शेतकऱ्यांनी माती व पाणी नमुन्यांचे परीक्षण केले. सन 2021 मध्ये फक्त 2 हजार 136 शेतकऱ्यांनी माती व पाणी परीक्षण केले होते. गतवर्षीच्या तुलनेत यामध्ये तीनपट वाढ झाली. जिल्ह्यातील जमिनीचा सुपीकता निर्देशांक म्हणजे नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण कमी-मध्यम- मध्यम असे आहे.

माती व पाणी परीक्षणातून जमिनीत कोणते घटक कमी व जास्त आहे, याची माहिती मिळते. नगर शहरातील भुतकरवाडी येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत शेतकऱ्यांना माती व पाणी परीक्षण करून दिले जाते. मार्च 2022 अखेर येथील प्रयोगशाळेत साधे माती नमुने 883, साधे पाणी नमुने 101, विशेष नमुने 1 हजार 339, सूक्ष्म 156 नमुन्याची तपासणी करण्यात आली. तसेच 17 सेंद्रिय शेती गटांनी 357 माती व पाणी परीक्षण करून घेतले. 3 हजार 984 प्रात्यक्षिक नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या प्रयोगशाळेत एकूण 7 हजार 719 नमुने प्राप्त झाले होते. त्यापैकी 6 हजार 820 माती व पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

सन 2021 मध्ये 2136 नमुन्यांची केली तपासणी

अहमदनगर येथील मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळेत 2021 मध्ये साधे माती नमुने 212, पाणी 124 नमुने, विशेष 1 हजार 486 नमुने, सुक्ष्म 104 नमुने, 10 सेंद्रिय शेती गटाने 210 असे एकूण 2 हजार 136 माती व पाणी नमुन्यांचे परीक्षण केले.

या घटकांची होते तपासणी

माती व पाणी नमुन्याच्या तपासणीत जमिनीतील सेंद्रिय कर्ब, स्फुरद, पालाश, पीएच, ईसी व पाण्यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम क्लोराइड, कार्बोनेट, बायकार्बोनेट, सल्फेट, विद्राव्य क्षार, मुक्त चुना, जमिनीचा पोत, तांबे, लोह, झिंक, मॅंगनीज या घटकांची तपासणी केली जाते.

पिकांच्या उत्पादन वाढीस मदत

माती व पाणी परीक्षण करणे सर्व पिकांसाठी आवश्यक आहे. विशेष करून ऊस, कापूस, गहू, हरभरा, संत्रा, मोसंबी, लिंबू, डाळिंब, पेरू, आंबा, सीताफळ, द्राक्षे, कांदा व भाजीपाला या पिकांच्या लागवडीपूर्वी माती व पाणी परीक्षण करणे फायदेशीर ठरते. माती व पाणी परीक्षणाने संभाव्य नुकसान टाळून उत्पादन वाढीत मदत होते, असे प्रभारी जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी रोहन भोसले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...