आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर अर्बन बँकेतून घेतलेल्या सुमारे तीन कोटी रुपये कर्जाच्या रकमेचा गैरवापर करत सदर रक्कम श्रीगोंदे तालुक्यात सुमारे ७० एकर जमीन खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. या जमिनीचे पुढील खरेदी व विक्रीचे व्यवहार थांबविण्याबाबत महसूल व भूमिअभिलेख विभागाला पत्र देण्यात आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक कमलाकर जाधव यांनी सांगितले. माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून दाखल असलेल्या नगर अर्बन बँकेतील १५० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.
बँकेच्या सर्व कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू आहे. त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. बँकेच्या काही माजी पदाधिकार्यांनी कर्जत व श्रीगोंदे तालुक्याच्या काही भागातून महामार्ग जाणार असल्याने त्यावेळी जमिनीला किंमत येईल, या उद्देशाने श्रीगोंदे तालुक्यातील एका गावात सुमारे ७० एकर जमीन खरेदी केली आहे. या खरेदीसाठी बँकेतून पैसे वर्ग झाल्याचे समोर आल्याने पोलिसांनी या संबंधित जमिनीच्या विक्रीचे होणारे व्यवहार पाहून संबंधित शासकीय कार्यालयांशी पत्र व्यवहार केला होता. त्यानंतर या जमिनीच्या खरेदी व विक्रीच्या व्यवहारावर निर्बंध घातले असल्याचे जाधव यांनी सांगितले. दरम्यान, बँकेतून घेतलेल्या कर्जाच्या रकमेचा गैरवापर झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. फॉरेन्सिक ऑडिट मधून या पैशांचा वापर कुठे झाला, या रकमा कोणापर्यंत पोहोचल्या याची माहिती समोर येत आहे. जमीन खरेदीसाठी कर्जाच्या रकमेचा वापर झाल्याचे समोर आले असले, तरी अशी आणखी प्रकरणे समोर येऊ शकतात, असे सांगत फॉरेन्सिकचा अंतिम अहवाल लवकरच येईल, असेही उपअधीक्षक जाधव यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.