आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपायोजना:वीज वितरणातील सुधारणेसाठी नेवासे तालुक्यात 70 ​​​​​​​ कोटींच्या कामास मंजुरी; आमदार शंकरराव गडाख यांची माहिती

साेनई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांच्या विजेची वाढीव गरज भागवण्यासाठी आणि वीज वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी ७० कोटींच्या विविध कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यात विजेची नवीन ४ उपकेंद्रे व ८ उपकेंद्रांची क्षमता वाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांचा समावेश आहे, अशी माहिती आमदार शंकरराव गडाख यांनी दिली.

नेवासे तालुका हा क्षेत्रफळाने मोठा आहे. बागायती तालुका आहे. त्यामुळे विजेची गरजही जास्त आहे. ती पूर्ण करण्याच्या बाबतीत तालुक्यातून अनेक शेतकरी व ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्याचे निराकरण करण्याच्या दृष्टीने नेवासे, नाशिक व मुंबई येथील अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन हे सर्व प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने तालुक्याचा आराखडा तयार केला होता. त्याला आता मंजुरी मिळाली असल्याचे आमदार गडाख यांनी सांगितले. नवीन मंजूर झालेल्या विजेच्या उपकेंद्रांमध्ये घोगरगाव, पाचेगाव, तामसवाडी व नेवासे खुर्दचा समावेश असून त्याशिवाय सध्या कार्यरत असणाऱ्या ८ उपकेंद्रांमध्ये क्षमता वाढीला मंजुरी मिळाली. त्यात माका, तेलकुडगाव, बेलपिंपळगाव, खडका, उस्थळ खालसा, घोडेगाव, गेवराई व करजगाव या उपकेंद्रांचा समावेश आहे.

तेथे जादा क्षमतेचे पावर ट्रान्सफार्मर बसवल्यामुळे या उपकेंद्रांच्या परिसरात विजेसाठी वाढीव लोड लक्षात घेऊन त्याची गरज भागवण्याच्या दृष्टीने त्याची मदत होणार आहे. तसेच या उपायोजना केल्यामुळे विजेच्या वितरण व्यवस्थेत सुधारणा होणार असून परिसरातील शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना सध्या वीज पुरवठ्यामध्ये ज्या अडचणी येतात, त्या सोडवण्यास मदत होणार असल्याचे गडाख यांनी सांगितले. वीज पुरवठ्यात सातत्य राहण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी लिंकलाईनची कामे, गावठाण फिडर स्वतंत्र करून नवीन रोहित्र बसवण्याची कामे होणार आहेत. कृषी वीज जोडणी धोरण २०२० या योजनेत घोगरगाव व धनगरवाडी या वीज उपकेंद्रांसाठी सुमारे ८ कोटी रुपये निधी यापूर्वीच मंजूर होऊन या उपकेंद्राच्या उभारणीचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती आमदार गडाख यांनी दिली. सद्यस्थितीला तालुक्यात विजेची गरज वाढलेली असल्याने सध्याच्या उपकेंद्रांची क्षमता अपुरी पडत होती. लोड वाढल्यामुळे ट्रान्सफार्मर जळण्याचे प्रमाण वाढले आहे. विजेचा पुरवठा नियमित होत नाही तसेच तो पुरेशा दाबाने होत नाही. शेतकरी व ग्रामस्थांच्या विजेबाबतच्या तक्रारींचे निराकरण होण्यास मदत होणार आहे. उपकेंद्रांच्या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

आमदार गडाखांनी निवडणुकीत दिलेला शब्द पाळला
माजी मंत्री तथा विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांनी विधानसभा निवडणुकीत घोगरगाव व जैनपूर, बेलपिंपळगाव परिसरातील विजेची समस्या सोडवण्यासाठी नवीन वीज सबस्टेशन मंजूर करू, असा शब्द दिला होता. त्या शब्दाची वचनपूर्ती आमदार गडाख यांनी केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले, असे नेवासे तालुक्यातील घोगरगाव येथील ग्रामस्थ राधाकीसन बहिरट यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...