आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअतिवृष्टी व काढणीला पीक आल्यावर अवकाळी पावसामुळे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या अर्थात महाबीजच्या अहमदनगर जिल्ह्यातील बीजोत्पादन प्लॉटला फटका बसला आहे. त्यामुळे सोयाबीन व उडदाच्या बीजोत्पादनात घट झाली असून जिल्ह्यात या बियाण्यांचा तुटवडा भासत आहे.
7 हजार क्विंटल सोयाबीनचा होतो आहे पुरवठा
वितरकांनी मागणी 28 हजार क्विंटल असताना यावर्षी महाबीजकडून फक्त 7 हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याचा पुरवठा झाला. यापैकी महाबीजने जिल्ह्याच्या कृषी विभागाला 3 हजार क्विंटल सोयाबीन बियाणे प्रात्यक्षिकासाठी दिले. उर्वरित 4 हजार क्विंटल बियाणे वितरकांना उपलब्ध करून देण्यात आले.
2700 हेक्टरवर राबवले प्रकल्प
नगर जिल्ह्यात खरिपात 1 लाख 24 हजार 804 हेक्टर सोयाबीन पेरणीचे नियोजन आहे. यासाठी जिल्ह्याला 70 हजार क्विंटल बियाण्याची गरज आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने जिल्ह्यामध्ये मागील वर्षी 2700 हेक्टरवर सोयाबीनच्या बीजोत्पादनाचे प्रकल्प राबवले. यातून अपेक्षित उत्पादन झाले नाही. उन्हाळी हंगामात महाबीजने जिल्ह्यात 750 हेक्टरवर बीजोत्पादन केले. यातून महाबीजला फक्त 300 क्विंटल बियाणे मिळाले.
महाबीजकडून 750 क्विंटल वितरकांना पुरवठा
बीजोत्पादनासाठी महाबीज शेतकऱ्यांकडून प्रमाणित बियाणे प्रतिक्विंटल 7 हजार 800 रुपये, तर पायाभूत बियाणे 8 हजार 400 रुपये दराने खरेदी करते. खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील वितरकांनी महाबीजकडे 28 हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी केली होती. परंतु जिल्ह्यात महाबीजकडून 7 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. उडीद बियाणाची वितरकांनी 15 हजार क्विंटलची नोंदणी केली होती. परंतु महाबीजकडून 750 क्विंटल वितरकांना पुरवठा करण्यात आला.
हे बियाणे मुबलक
भाताच्या बियाणाची वितरकांनी 600 क्विंटल नोंदणी केली होती. महाबीजने 650 क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले. बाजरीचे बियाणाची वितरकांनी 200 क्विंटलची नोंदणी केली होती. प्रत्यक्षात 153 क्विंटल बियाणे दिले. तुरीच्या बियाणाची वितरकांनी 400 क्विंटल मागणी केली होती. महाबीजने प्रत्यक्षात 264 क्विंटल तुरीचे बियाणे दिले. जिल्ह्यात प्रात्यक्षिकासाठी मुगाचे 40 क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले, अशी माहिती महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक रवींद्र जोशी यांनी दिली.
शेतकऱ्यांना अनुदान
महाबीजच्या बियाणावर कृषी विभागाच्या वतीने प्रात्यक्षिकासाठी अनुदान दिले जाते. सोयाबीनच्या 30 किलो बॅगची किंमत 4200 रुपये आहे. अनुदानावर ही बॅग 2850 रुपयाला मिळते. मुगाच्या 2 किलोची बॅगेचा दर 300 रुपये आहे. अनुदानावर 200 रुपयाला मिळते. 5 किलोची उडीद बॅग किंमत 750 रुपये आहे, अनुदानावर ती 500 रुपयाला मिळते. 2 किलो तूर बॅगेचा दर 280 रुपये असून अनुदानावर ती 180 रुपयाला मिळते. मका 4 किलो बॅग 650 रुपये किंमत असून अनुदानावर 340 रुपयाला मिळते. भाताची 25 किलोची बॅग किंमत 925 रुपये आहे, ती अनुदानावर 462 रुपयाला मिळते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.