आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरमध्ये 'स्वाईन फ्लू'ची धडकी:18 दिवसांत 8 बळी; पहिला मृत्यू 10 ऑगस्टला; जिल्ह्यात बाधितांचा आकडा गेला 25 वर

दीपक कांबळे I अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना अद्याप हद्दपार झाला नसताना स्वाईन फ्लू आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दोन वर्षानंतर स्वाईन फ्लूमुळे 10 ऑगस्टला पहिला बळी गेला होता. त्यानंतर मृत्यूचा आकडा वाढतच चालला आहे. जिल्ह्यात 18 दिवसांत तब्बल 8 मृत्यू स्वाईन फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात बाधितांचा आकडा आता 25 वर पोहोचला आहे.

'स्वाईन फ्लु'ची धडकी

कोरोनात होरपळल्यानंतर आता स्वाईन फ्लूने धडकी भरवली. आरोग्य विभागाकडे 1 जानेवारी ते 30 ऑगस्ट या कालावधीत 25 जणांना स्वाईन फ्लूची बाधा झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 2019 मध्ये 1 लाख 33 हजार 628 रूग्णांची तपासणी झाली होती, त्यावेळी 53 रूग्ण पॉझिटिव्ह व 15 जणांचा मृत्यू झाला होता. पुढे 2020 व 2021 मध्ये कोरोना रूग्णसंख्या व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा वाढत होता. त्या कालावधीत स्वाईन फ्लूचा एकही मृत्यू झाला नसल्याचे नोंदवण्यात आले.

कोरोना संसर्ग कमी होत असताना पुन्हा एकदा स्वाईन फ्लुची रूग्णसंख्या झपाट्याने वाढतानाचे चित्र आहे. बहुतांश रूग्ण संगमनेर तालुक्यातील आहेत. बाधित 25 रूग्णांपैकी या वर्षात पहिला मृत्यू 10 ऑगस्ट 2022 रोजी झाला. त्यानंतर 15 ऑगस्ट, 23 ऑगस्ट, 24 ऑगस्ट, 19 ऑगस्ट, 24 ऑगस्ट, 25 ऑगस्ट व 28 ऑगस्ट या दिवशी स्वाईन फ्लूमुळे रूग्णांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात मृत्युचा वाढता आकडा चिंता वाढवणारा आहे.

कोपरगाव, संगमनेरमध्ये मृत्यू

संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी, येठेवाडी, अश्वी खूर्द, कोपरगाव तालुक्यातील बेलेकर वस्ती, अंजनापूर, ब्राम्हणगाव, नगर तालुक्यात वडगाव गुप्ता, पिंपरी जलसेन (पारनेर), या ठिकाणी स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाले आहेत. यापार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने संपर्कातील नागरिकांची तपासणी सुरू केली.

बेफिकीरीमुळे फैलाव

कोरोनाचे रूग्ण कमी झाल्यानंतर नागरिकांनी मास्क वापरणे बंद केले. सुरक्षात्मक कोणतीही उपाय योजना फारशी होताना दिसत नाही. कोरोना तसेच स्वाईनफ्लू हे संसर्गजन्य आजार आहेत. त्यामुळे उत्सव कालावधीत गर्दीत मास्कचा वापर न केल्याने फैलाव अधिक होण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...