आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवारी 'एमपीएससी'ची पूर्व परीक्षा:24 उपकेंद्रावर 8 हजार 616 उमेदवार देणार परीक्षा, केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यसेवा (पूर्व) परीक्षा रविवार 21 ऑगस्टला अहमदनगर जिल्ह्यातील 24 उपकेंद्रावर सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत दोन सत्रात होणार आहे. 8 हजार 616 उमेदवार ही परीक्षा देतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात येणार आहेत, अशी माहिती परीक्षेचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी बुधवारी 17 ऑगस्टला दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परिक्षेसाठी अहमदनगर शहरातील शाळा व महाविद्यालये असलेली 24 उपकेंद्र निश्चित करण्यात आले आहेत. या उपकेंद्रावर उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून 2 सत्रात ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उपजिल्हाधिकारी संवर्गातील समन्वय अधिकारी-6 , भरारी पथक प्रमुख-1, वर्ग 1 संवर्गातील उपकेंद्र प्रमुख - 24 अधिकारी तसेच पर्यवेक्षक, सहायक, समवेक्षक, मदतनीस असे विविध वर्ग 3 संवर्गातील एकूण 902 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे निचित यांनी सांगितले.

परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रथम सत्रासाठी सकाळी 8.30 वाजता व दुसऱ्या सत्रासाठी दुपारी 1.30 वाजता प्रवेश देण्यात येणार आहे. उमेदवारांनी काळया शाईचे बॉलपॉइंट पेन वापरणे आवश्यक असून ,उमेदवारांना एकमेकांचे पेन व लिखान साहित्य वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. असे निचित यांनी सांगितले.

मोबाईल बाळगण्यात मनाई

परीक्षेदरम्यान उपकेंद्रावर व कक्षात मोबाईल, पेजर डिजीटल डायरी, मायक्रोफोन, स्मार्टवॉच यांसारखी दूरसंचार साधने व कॅल्क्युलेटर आणण्यास व स्वतःजवळ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवाराला सदर परिक्षेसाठी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढील सर्व परीक्षांसाठी कायमस्वरूपी प्रतिरोधीत करण्यात येणार आहे, असे निचित यांनी सांगितले.

परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील 24 उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. उपकेंद्रावरील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.तसेच परीक्षा उपकेंद्राच्या परीक्षेच्या दिवशी 100 मीटर परिसरातील एसटीडी बुथ, फॅक्स मीटर, झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर उपकेंद्रावर 144 कलम लागू करण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...