आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपत्ती:शहरातील 95 किमी लांबीच्या 41 ओढे-नाल्यांवर 8.23 किमी अतिक्रमण

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील उपनगर परिसरात ४१ ओढे व नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह पाइप टाकून बंद करण्यात आले आहेत. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात सुमारे ९५ किमी लांबीच्या ओढे व नाल्यांपैकी ८.२३ किमी लांबीचे प्रवाह पाइप टाकून वळवण्यात आल्याचे समोर आले आहे. या विषयाचा पाठपुरावा करणारे शशिकांत चंगेडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहराचे १९७२ पासून ते आत्तापर्यंतचे विकास आराखडे व नकाशे तपासण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक राम चारठाणकर यांनी दिली.

पाइप टाकून ओढे व नाले बुजवण्यात आल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते. यासंदर्भात शशिकांत चंगेडे हे गेल्या अनेक वर्षांपासून तक्रारी व पाठपुरावा करत आहेत. नगर विकास विभागाच्या आदेशानुसार सप्टेंबर महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. त्यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी महापालिकेत चंगेडे व मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. महापालिकेने नाशिकच्या कंपनीमार्फत केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील सुमारे ९५ किमी लांबीच्या ४१ ओढे व नाल्यांवर ८.२३ किमीपर्यंत अतिक्रमण झालेले आहे. यात ४.९१ किमी लांबीचे नाले सद्यस्थितीत मोकळ्या जागेत असून ते पाईप टाकून बुजविण्यात आले आहेत.

तर ३.३२ किमी लांबीच्या नाल्यांवर इमारतींचे बांधकाम झालेले आहे. सदरची माहिती महापालिकेकडून चंगेडे यांना बैठकीत देण्यात आली आहे. ओढे व नाले अस्तित्वात असताना पाइप टाकून त्याचे प्रवाह अरुंद करण्यात आले. विकास आराखड्यांवर अनेक नाल्यांचा समावेश मनपाने केलेला नाही. यापूर्वीच्या काळात जुन्या नकाशांवर याचा उल्लेख होता. त्यामुळे जुने नकाशे व विकास आराखडेही मनपाने तपासावेत अशी भूमिका चंगेडे यांनी मांडली. त्यानंतर मनपाकडून सन १९७२ पासूनचे विकास आराखडे व नकाशे तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सावेडी भिस्तबागमध्ये सर्वाधिक अतिक्रमण
मनपाने खाजगी संस्थेमार्फत केलेल्या सर्वेक्षणानुसार सावेडी भिस्तबागमध्ये सर्वाधिक ३.३७ किमी अतिक्रमण आहे. बोल्हेगाव-नागापूरमध्ये १.०१ किमी, नालेगाव- मोरचूदनगरमध्ये ०.९२ किमी, केडगावमध्ये ०.४४ किमी, नगर (गावठाण सावेडी) मध्ये १.२० किमी, कॅन्टोन्मेंट (सावेडी) मध्ये १.२९ किमी अतिक्रमण आहे. तर खोकर नाला, भिंगार नाला व सीना नदीवरील एकाही अतिक्रमणाची नोंद आकडेवारीत नाही.

माहितीसाठी प्रति पृष्ठ ४० रुपये दर?
नागरिक कृती मंचचे चंगेडे यांनी मनपाकडे शहराच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची मागणी माहिती अधिकारात केली होती. या कायद्यातील तरतुदीनुसार प्रति पृष्ठ २ रुपये आकारणे बंधनकारक केले आहे. मात्र मनपाने चंगेडे यांना ४० रुपये प्रति पृष्ठ दर आकारला आहे. तो कशाच्या आधारावर असा प्रश्न चंगेडे यांना पडला आहे. आराखड्याची २६९ पृष्ठे आहेत. त्याची किंमत १०३६० रुपये होते हा दर म्हणजे माहिती न देण्याचाच भाग असल्याची प्रतिक्रिया चंगेडे यांनी व्यक्त केली.

तीन टप्प्यात होणार कारवाई
पहिल्या टप्प्यात मोकळ्या जागेवरील अतिक्रमणे काढली जातील, त्यानंतर झालेल्या अतिक्रमणांचा व बांधकामांचा शोध घेतला जाईल, त्यानंतर विधिज्ञांचा सल्ला घेऊन अतिक्रमणे काढण्याची मोहीम राबवली जाईल, असे नगररचनाकार चारठाणकर यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनीही अतिक्रमणाची शॉर्ट टर्म, मिड टर्म, लाँग टर्म अशी तीन टप्प्यात कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...