आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकबाकीदार:महानगरपालिकेचा करच भरत नाहीत शहरातील 84 टक्के थकबाकीदार

मयूर मेहता | नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसेंदिवस महापालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी वाढतच आहे. दरवर्षी नियमित कर भरणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही कमी होत आहे. त्यातही वर्षानुवर्षे थकीत असलेल्या कराचा भरणा करणाऱ्यांचे प्रमाणही अत्यल्प आहे. वर्षभरात फक्त १६ टक्के थकबाकीदारांनी ३२ कोटींचा कर भरला आहे. तर ८४ टक्के थकबाकीदारांकडे १६४ कोटी रुपये थकीत आहेत. दरम्यान, ५३ टक्के मालमत्ताधारकांनी चालू वर्षाचा २६.५४ कोटींचा कर भरल्याने यंदा वसुली ५९ कोटींवर पोहचली आहे. अद्यापही १८७ कोटी रुपये थकीत आहेत.

थकबाकीदारांना आकर्षित करण्यासाठी महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आयुक्त पंकज जावळे यांनी संपूर्ण शास्ती माफ केली होती. २६ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ही सवलत दिली होती. मात्र, केवळ १२ हजार १३१ थकबाकीदारांनीच या सवलतीचा लाभ घेत १८.३२ कोटींचा थकीत कर भरला. चालू वर्षात १९५.७४ कोटी रुपये थकबाकी व ५०.२८ कोटी रुपये नवीन मागणी अशी एकूण २४६.०२ कोटींची मागणी होती. त्यापैकी १६.३६ टक्के थकबाकीदारांनी ३२.०२ कोटी रुपये भरले आहेत. तर ५२.७८ टक्के मालमत्ताधारकांनी २६.५४ कोटी रुपये चालू वर्षीचा कर भरला आहे. दरवर्षी निम्मेच करदाते कर भरत असल्याने वसुलीचे प्रमाण घटून २३.८१ टक्क्यांवर आले आहे. दरम्यान, थकबाकीदारांपैकी बहुतांशी करदात्यांकडे १ लाखापेक्षा कमी थकबाकी आहे. दरवर्षी शास्तीची रक्कम वाढत असल्याने, त्यांच्या थकबाकीची रक्कमही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

२५१४ करदात्यांकडे ९७.५८ कोटी थकीत
महापालिकेकडील उपलब्ध नोंदीनुसार १ लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या २५१४ थकबाकीदार करदात्यांकडे तब्बल ९७ कोटी ५८ लाख ५५ हजार ११ रुपये थकीत आहेत. तर ५ लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या २४४ करदात्यांकडे तब्बल ५३ कोटी ३२ लाख ८९ हजार ३४२ रुपये थकीत आहेत.

१०० बड्या करदात्यांना थकवले ४२.३६ कोटी
महापालिकेकडून सध्या एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांवर कारवाई सुरू आहे. मात्र, आता १०० बड्या थकबाकीदार करदात्यांकडे तब्बल ४२ कोटी ३६ लाख ६५ हजार ७८७ रुपये थकीत असल्याचे समोर आले आहे. या थकबाकीदारांवरच कारवाई करण्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

१४ लिपिकांना ५ हजार दंड
आयुक्त पंकज जावळे यांनी शुक्रवारी सर्व वसुली लिपिकांचा आढावा घेतला. यात २० टक्क्यांपेक्षा कमी वसुली असलेल्या १४ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये दंड करण्यात आला आहे. तर ज्यांची वसुली ३० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा कर्मचाऱ्यांना ३ हजार रुपये दंड करण्यात आला आहे. त्यांना कारणे दाखवा नोटिसाही बजावण्यात आल्याचे उपायुक्त सचिन बांगर यांनी सांगितले.

‘त्या’ मोकळ्या भूखंडांवर महापालिकेचे नाव लागणार
महापालिका हद्दीत अनेक मोकळे भूखंड आहेत. त्यांचे मालक वर्षानुवर्षे मालमत्ता कर भरत नाहीत. त्यांची थकबाकीही मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या ६ महिन्यात या थकबाकीदारांवर काहीच कारवाई झालेली नाही. येत्या १५ दिवसांत अशा लोकांना शोधा व त्यांना नोटीसा द्या. एवढे करूनही त्यांनी थकबाकी भरली नाही तर तातडीने त्या त्या भागातील तलाठी कार्यालयात जावून त्या मोकळ्या भूखंडावर मनपाचे नाव लावा, असे आदेश आयुक्त पंकज जावळे यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...