आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक निवडणूक:21 जागांसाठी विक्रमी 852 अर्ज दाखल, सर्वच मंडळांचा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा हेका कायम

अहमदनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीत २१ जागांसाठी विक्रमी ८५२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची शुक्रवारी (२४ जून) छाननी होणार आहे. सर्वच मंडळांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याचा हेका कायम ठेवला असला, तरी छाननीनंतर युती-आघाडीच्या बैठकांना वेग येण्याची शक्यता आहे.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून २४ जुलैला मतदान होणार आहे. तत्पूर्वी १७ जूनपासून अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. गुरूवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. सर्वसाधारण १६ जागांसाठी संमनेर येथून ४६, नगर ४१, पारनेर ४२, कोपरगाव २५, राहाता २८, श्रीरामपूर ३७, जामखेड ४०, पाथर्डी ४३, राहुरी २६, शेवगाव २५, श्रीगोंदे ४१, अकोले २७, नेवासे ४१, कर्जत ३१, नगरपालिका, भिंगार कँन्टोन्मेंट, केंद्र प्रमुख, नॉन टिचिंगसाठी ३६ अर्ज दाखल आहेत. तर राखीव प्रवर्गासाठी अनुसुचित जाती, जमाती ३६, महिला राखीव १०३, इतर मागास प्रवर्ग ९०, विमुक्त जाती, भ. जमाती, विशेष मागास प्रवर्गासाठी ६५ अर्ज गुरूवारअखेर दाखल झाले.

दाखल अर्जांची जिल्हा उपनिबंधक कार्यालयात २४ जूनला छाननी होणार असून २७ जूनला वैध अर्जांची यादी प्रसिद्ध होणार आहे. अर्ज माघारीसाठी २७ जून ते ११ जुलैपर्यंतचा कालावधी आहे. त्यानंतर निशानी वाटप व आवश्यकता भासल्यास २४ जुलैला मतदान व २५ जुलैला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, गुरूकुल मंडळ, बहुजन मंडळ, सदिच्छा मंडळ, रोहोकले प्रणित गुरूमाऊली मंडळ तर तांबे गटाच्या गुरूमाऊली मंडळाने स्वबळाची व प्रसंगी बिनविरोध निवडणूक करण्याची तयारी दर्शवली आहे.

वैध अर्जांची यादी २७ जूनला प्रसिद्ध झाल्यानंतर युती व आघाडीसाठी लहान व मोठ्या मंडळातील नेत्यांमध्ये खलबतं होतील. बँकेच्या मतदारांची संख्या १० हजार ५५२ असली तरी मंडळे व संघटनांची संख्या मोठी असल्याने आघाडीला प्राधान्य देणार असल्याचे काही मंडळांच्या शिक्षक नेत्यांनी खासगीत बोलताना सांगितले.