आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिर्डी:कोरोना उद्रेकामुळे शिर्डीत दर्शनास येणाऱ्या भाविकांमध्ये 90 टक्के घट

शिर्डी / नवनाथ दिघे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साईबाबा मंदिर अनलॉक झाल्यानंतर शिर्डीत भाविकांची मांदियाळी हळूहळू वाढत असतानाच पुन्हा राज्यात कोरोनाचा मोठा उद्रेक झाल्याने येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. कोरोना संकटापूर्वी लाखो भाविकांच्या गर्दीने शिर्डी फुलून जात होती. परंतु, आता कोरोनामुळे रोज सहा ते सात हजारांच्या आसपास भाविक येत असल्याने शिर्डीच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे. राज्यात वाढत्या कोरोनाचा दक्षिण भारतातील भाविकांनी मोठा धसका घेतल्याने गेल्या आठवडाभरापासून शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणावर रोडावली आहे.

साईबाबा संस्थान प्रशासनाने फिजिकल डिस्टन्सिंगद्वारे रोज सुमारे तीस हजारांच्या आसपास भाविक दर्शन घेऊ शकतील अशी उत्तम व्यवस्था केली आहे. मंदिर अनलॉक झाल्यानंतर संस्थान प्रशासनाने सुरू केलेल्या दर्शनव्यवस्थेवर देशभरातील भाविकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दर्शनव्यवस्था सुलभ आणि सुकर होत असल्याने भाविकांची संख्याही वाढत होती. विमानसेवा सुरू झाल्याने दक्षिण भारतातील विमाने भाविकांच्या गर्दीने शिर्डीत ये-जा करीत होते. आता पुन्हा शिर्डीतील गर्दी पूर्वपदावर येऊन शिर्डीत अर्थकारणाला गती मिळण्याची आशा निर्माण झालेली असतानाच राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने त्याचा भाविकांवर मोठा परिणाम जाणवत आहे. गुरुवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवशी शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या दहा हजारांपर्यंत आली आहे तर इतर दिवशी हीच संख्या सहा ते सात हजारांवर आहे. साईबाबांच्या भोजन प्रसादालयाची दररोज ४० हजार भाविकांना भोजन प्रसाद देण्याची क्षमता आहे. मात्र, सद्यस्थितीत अवघे सहा ते सात हजार भाविकच प्रसाद घेत आहेत.

पुन्हा भाविकांना मिळू लागला लाडू प्रसाद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत येणाऱ्या भाविकांना दर्शनरांगेत दिला जाणारा मोफत बुंदी प्रसाद पाकीट बंद करण्यात आले होते. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या प्रयत्नातून आता तिरूपतीच्या धर्तीवर भाविकांना ५० ग्रॅम वजनाचा साजूक तुपातील व काजू, किसमिस, बदामाचा कूट असलेला लाडू प्रसाद वाटप सुरू केल्यावर भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

शिर्डीच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम
कोरोनाच्या संकटात शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावल्याने शिर्डीतील हॉटेल उद्योगासह लहान-मोठे व्यावसायिक आर्थिक संकटाचा सामना करत आहे. बँकांचे कर्ज थकले आहे. नगरपंचायतीने कर व गाळाभाडे माफ करून व्यावसायिकांना दिलासा द्यावा. त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे .सत्ताधाऱ्यांशी या प्रश्नावर आम्ही संघर्ष करणार आहोत. - कमलाकर कोते, शिवसेना नेते

बातम्या आणखी आहेत...