आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेला गुरुवारपासून (२ मार्च) नगर जिल्ह्यातील १७९ परीक्षा केंद्रांवर सुरुवात झाली. सकाळी ११ वाजता मराठी विषयाचा पेपरला सुरुवात झाली. दहावीच्या परीक्षेला ५८ हजार ९१० परीक्षार्थी उपस्थित होते, तर ९११ परीक्षार्थींनी दांडी मारली. दरम्यान, नगर शहरातील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये चक्क माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी अशोक कडूस यांनी एका कॉपीबहाद्दरास पकडले. नगर जिल्ह्यात २ ते २५ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून, त्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम साळीमठ यांच्या अध्यक्षतेखाली पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण अधिकारी (योजना), प्राथमिक शिक्षणाधिकारी व प्राचार्य यांची ७ पथके नियुक्त केली आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी ५९ हजार ८२१ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी ५८ हजार ९१० परीक्षार्थी उपस्थित होते, तर ९११ परीक्षार्थींनी दांडी मारली.
सकाळी ११ वाजता नगर शहरासह जिल्ह्यातील १७९ परीक्षा केंद्रांवर दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. विविध केंद्रांबाहेर पाल्यांना शुभेच्छा देण्यासाठी पालकांनीही मोठी गर्दी केली. पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडत परीक्षा केंद्राबाहेर पडले. विद्यार्थ्यांनी एकमेकांशी चर्चा करत पेपरमधील प्रश्नांबद्दल चर्चा केली. दरम्यान, शहरात एका केंद्राचा अपवाद वगळता मराठीचा पेपर शांततेत पार पडला. आता दुसरा इंग्रजीचा पेपर सोमवारी (६ मार्च) आहे. या पेपरच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना चार दिवसांचा वेळ मिळणार आहे.
केंद्रांवर परीक्षार्थींची झडती
परीक्षा कक्षात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक केंद्रांवर परीक्षार्थींची झडती घेण्यात आली. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचीही परीक्षा केंद्राबाहेर मोठी गर्दी झाली होती. नगर शहरातील जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या रेसिडेन्शियल हायस्कूल येथील केंद्रांवर परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कॉपी करताना एकास पकडले
कॉपीमुक्त अभियानांतर्गत शहरातील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये मराठी विषयाच्या पेपरला कॉपी करताना थेट शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी एकास पकडले. दरम्यान, जिल्ह्यातील अन्य परीक्षा केंद्रावरही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.