आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात सरकारी दवाखान्यांना आयुष्मान भारत योजनेंतर्गत रंगरंगोटी करून त्यावर वारली चित्रे रेखाटण्यात आली आहेत. आता सुंदर माझा दवाखाना उपक्रमांतर्गत ७ एप्रिलपासून विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्यानुसार रूग्णालय परिसर स्वच्छ करून त्यात सातत्य ठेवण्यासाठी दर शनिवारी स्वच्छता मोहिम राबवली जाते. तथापि, उत्कृष्ट दवाखाना निवडीची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त ७ एप्रिलपासून सुंदर माझा दवाखाना उपक्रम हाती घेण्यात आला. या मोहिमेत आरोग्य केंद्र, परिसर, स्वच्छतागृहे, भांडारगृहे आदींची स्वच्छता करण्याचे निश्चित केले. त्याचबरोबर रूग्णालयाच्या आवारात दर्शनी भागात सुशोभिकरण, रंगरंगोटी, रूग्णालयातील उपलब्ध सुविधांच्या माहितीचे फलक लावण्यात आले आहेत. स्थानिक रूग्ण कल्याण समिती, स्वयंसेवक, लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घेण्यात आला. या उपक्रमाला सुरूवात करताना, शासकीय रूग्णालयांची अगोदरची स्थिती व उपक्रम राबवल्यानंतर झालेला कायापालट याच्या नोंदी आरोग्य विभाग घेत आहे. याचा अहवाल फोटोसह शासनाला पाठवला जाणार आहे.
दर शनिवारी पाळला जातो स्वच्छता दिवस
आरोग्य संस्था स्वच्छ व प्रसन्न ठेवणे, रूग्णालय इमारती आत व बाहेर स्वच्छ करणे. रूग्णालयाबाहेर माहितीचे फलक लावण्यात आले. बगीचा संगोपन करणे, रूग्णालयातील भंडार साहित्याचे निर्लेखन करणे, दर शनिवारी सर्व शासकीय रूग्णालयात स्वच्छता दिवस पाळला जात आहे.
प्रत्येक तालुक्यातून एक उपकेंद्र याप्रमाणे १४ आरोग्य उपकेंद्र व जिल्हास्तरावर तीन उत्कृष्ट आरोग्य केंद्रांना पुरस्कार देण्यात येणार आहे. उत्कृष्ट केंद्रांची निवड करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला होता. परंतु, अहवाल उशिरा आल्याने सुंदर माझा दवाखाना उपक्रमांतर्गत उत्कृष्ट रूग्णालयांची यादी अद्याप निश्चित होऊ शकली नाही. पारितोषिक वितरण १ मे रोजी करण्याचे निर्देश आरोग्य मंत्र्यांनी दिले होते. परंतु, तालुका व जिल्हास्तर समितीकडून अद्याप उत्तम गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करणाऱ्या आरोग्य संस्था निश्चित झाल्या नसल्याने पारितोषिक वितरण रखडले आहे.
आरोग्य उपसंचालकांना पाठवला अहवाल
प्रत्येक तालुक्यातील एक उपकेंद्र व जिल्हास्तरावर तीन आरोग्य केंद्रांची निवड करण्यात येणार आहे. या उपक्रमात उत्कृष्ट उपकेंद्राला दहा हजार तर आरोग्य केंद्राला २० हजार रूपयांचे पारितोषीत दिले जाणार आहे. जिल्हा गुणवत्ता समिती स्तरावर कार्यवाही सुरू आहे. तर पुढील प्रक्रियेसाठी आरोग्य उपसंचालकांना अहवाल पाठवला आहे. - डॉ. रवींद्र सोनवणे, आरोग्य अधिकारी.
या रूग्णालयांत राबवले अभियान
जिल्ह्यात जिल्हा परिषदे अंतर्गत ग्रामीण भागात ९८ आरोग्य केंद्र व ५५५ आरोग्य उपकेंद्र आहेत. या ठिकाणी मोहिम राबवली जाणार आहे. तसेच जिल्हा रूग्णालय, ३ उपजिल्हा, २२ ग्रामीण रूग्णालयात, सुंदर माझा दवाखाना अभियान राबवले जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.