आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:अ, आ, ई चे शिक्षण घेणार, आम्ही दररोज शाळेत येणार..., राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिला शाळा पूर्व तयारी मेळावा मोठ्या उत्साहात

नगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आपली मुले शाळेत पाठवा, मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही शिकवू छान, अ, आ, ई चे शिक्षण घेणार, आम्ही दररोज शाळेत येणार, अशा घोषणांसोबतच चल शाळेला चल चल तारा, नको राहू तू घरच्या घरा, हे गीत विद्यर्थ्यांनी शिक्षकांच्या साथीत म्हटले तर, सवेरे सवेरे यारो से मिलने, हे गीत स्पीकरवर ऐकत मिरवणूक वाजतगाजत, जनजागृती करत साऱ्या वस्तीचे लक्ष वेधून घेत होती, निमित्त होते राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्वतयारीच्या पहिल्या मेळाव्याचे.

गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्वतयारीचा पहिला मेळावा चेडगाव सेवा सोसायटीचे संचालक सीताराम जाधव, चेडगावचे माजी सरपंच ज्ञानदेव जाधव, व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सुरेश जाधव, सदस्य प्रमोद शिंदे, मुख्याध्यापक संदीप शेळके, नारायण मंगलारम, अंगणवाडी सेविका हिराबाई जाधव, मदतनीस छाया कुर्हे आणि माता पालक, शिक्षण प्रेमी नागरीक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाला.

मेळाव्याच्या सुरवातीला शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ला शाळेत प्रवेश पात्र असणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांना नारळाच्या झावळ्या, फुगे, माळा यांनी सजवलेल्या बैलगाडीतून आणि ढोल, झंझरी आणि स्पीकरच्या तालावर वास्तुतून मिरवून आणण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. शाळेत या चिमुकल्यांचे त्यांच्या मातेसह औक्षण करून आणि टोपी, गुलाब पुष्प, एक स्माईल चेंडू देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर प्रभात फेरी काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना नियमित शाळेत पाठवण्या बाबतच्या घोषणा दिल्या.

विकास कार्डवर विद्यार्थ्यांची नोंदणी करत प्रत्यक्ष शाळा पूर्व तयारी मेळाव्याला सुरवात झाली. इथे चिमुकल्यांची उंची मोजण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या मोठ्या पेन्सिलने सर्वच उपस्थितांची दाद मिळवली. आपल्या पेटीतील पेन्सिल सारखी दिसणारी भली मोठी पेन्सिल पाहून चिमुकले खुश झाले. वजन, उंची मोजता मोजता त्यांची नोंद घेत फोटोही काढून झाले. शाळेतल्या आणि नव्याने दाखल होत असलेल्या बरोबरच उपस्थित पालकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले ते म्हणजे छोटा भीम, छुटकी आणि मिकी व मिनी माऊसचे कट आऊट सह शाळेत काय काय शिकायला मिळणार हे सांगणारे आकर्षक आणि आगळे वेगळे असे दोन सेल्फी पॉइंट. शाळेच्या आजी माजी विद्यार्थी, पालक, प्रमुख अतिथींसह शिक्षक आणि अंगणवाडी कर्मचारी यांनी ही सेल्फी घेऊन मेळाव्याच्या स्मृती जतन केल्या.