आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावांबोरी घाट परिसरात शनिवारी सकाळी रस्त्यालगत अंदाजे १८ ते २० वर्षे वयाच्या अनोळखी युवकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या युवकाचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवला आहे.
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. युवकाचा मृतदेह बॅगेसह जाळून टाकण्यात आल्याचे आढळून आले. खासगी रुग्णवाहिकेतून हा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तपासासाठी पथकही रवाना करण्यात आले आहे.
युवक नगरचा की औरंगाबादचा?
युवकाला ठार करून त्याला बॅगेत टाकले व ती बॅग रस्त्यालगत झुडपात टाकून जाळण्यात आली, असा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे. मात्र, रस्त्यालगत मृतदेह आढळल्याने हा युवक नगरचा आहे की औरंगाबाद अथवा इतर जिल्ह्यातला, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.